जळगाव (प्रतिनिधी) कुसुंबा येथून बारावीचा पेपर देऊन घरी परतणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दुचाकीला ट्रॅक्टरने धडक दिल्याने एक विद्यार्थी जागीच ठार झाला. तर दुसरा विद्यार्थी व ट्रॅक्टर चालक असे दोन जण जखमी झाले आहेत. दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास हा अपघात हॉटेल निलांबरी (कुसुंबा) जवळ झाला.
या संदर्भात अधिक असे की, शहरातील मिल्लत ज्यूनिअर कॉलेजचे विद्यार्थी अदनान असद खान (वय १७, रा. अक्सानगर) व शेख मोहंमद शेख अब्दुल रहेमान कुरेशी (वय १७, रा. तांबापुरा) या दोघांचा आज ११ ते २ असा हिंदीचा पेपर कुसुंबा येथील स्वामी समर्थ विद्यालय कुसुंबा येथे होता. पेपर सुटल्यानंतर हे दोघं जण आपल्या दुचाकी क्रमांक (एमएच १९ एमव्ही ३०५५)वरून घरी परत येत होते. साधारण सव्वा दोन वाजेच्या सुमारास हॉटेल निलांबरी जवळ समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरसोबत त्यांच्या दुचाकीची समोरा-समोर धडक झाली. यात दुचाकी चालविणारा अदनान खान हा जागीच ठार झाला. तर शेख मोहंमद हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या पायाला मोठी दुखापत झाल्याचे कळते. दरम्यान, या अपघातात ट्रॅक्टर चालक देखील जखमी झाला असून ट्रक्टर एमआयडीसी पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
अपघात झाल्यानंतर शाळेत पेपर देण्यासाठी आलेल्या इतर विद्यार्थी मित्रांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व खासगी वाहनाने जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात दाखल केले. यावेळी नातेवाईक आणि मित्र मंडळींची जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात मोठ्या संख्येने गर्दी जमली होती.
मयत अदनान हा एकुलता एक मुलगा होता. त्याचे वडील असद खान हे रिक्षा चालक आहे. ते सामाजिक कार्यकर्ते असून त्यांनी अदनानच्या नावाने अदनान फाऊंडेशन स्थापन केली आहे. फाऊंडेशनच्या माध्यमातून ते सामाजिक कार्यक्रम घेत असतात.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/2581820948809872/