जळगाव प्रतिनिधी । येथील सामाजिक कार्यकर्त्या ज्योती भोई यांच्या आत्महत्ये प्रकरणी करण्यात आलेल्या तक्रारींनुसार संबंधीत पोलीस अधिकारी व कर्मचार्यांची चौकशी करण्यात यावी यासाठी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नोटिसा बजावल्या आहेत.
याबाबत माहिती अशी की, गेल्या वर्षी सामाजिक कार्यकर्त्या ज्योती भोई यांनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली होती. कुणाच्या तरी दबावामुळे त्यांनी आत्मघात केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. ज्योती भोई यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्यासंदर्भात गुन्हा दाखल होण्याकरीता पोलीस अधिक्षक अहमदनगर, तसेच पोलीस निरीक्षक अमळनेर व पोलीस अधिक्षक, जळगाव यांना याचिकाकर्ता प्रभाकर भाऊसाहेब भांबरकर तसेच सामाजिक कार्यकर्त्या स्मिता अष्टेकर यांनी तक्रार अर्ज देऊन पोलीस निरीक्षक विकास वाघ व इतर यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करावा अशी विनंती केली होती. परंतु सदरील पोलीस अधिक्षक जळगाव व पोलीस अधिक्षक अहमदनगर यांनी सदरील प्रकरणामध्ये कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही.
यानंतर याचिककर्ते पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रभाकर भांबरकर यांनी दिनांक. २९ सप्टेंबर २०२० रोजी पोलीस महासंचालक यांना पोलीस निरीक्षक विकास वाघ यांची सी.बी.आय मार्फत चौकशी करावी असा तक्रारी अर्ज दिला होता. तदनंतर शेवटी याचिकाकर्त्यांनी ०७ ऑक्टोबर २०२० रोजी पोलीस अधिक्षक जळगाव यांना तक्रार अर्ज देऊन पोलीस निरीक्षक वाघ व इतर अधिकारी व कर्मचारी यांच्या विरोधात ज्योती भोई यांना मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याने त्यांच्यावर भा.द.वी कलम ३०६ नुसार व इतर कलमानुसार गुन्हा दाखल करावा अशी तक्रार केली होती. त्याचप्रमाणे १८ ऑक्टोबर २०२० रोजीच्या नोटीसा अन्वये पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रभाकर भांबरकर यांनी आपला जबाबही दाखल केला होता. परंतु या प्रकरणामध्ये संशयाची सुई पोलीस निरीक्षक विकास वाघ व इतर यांच्यावर असल्यामुळे सदरील तक्रार अर्जाच्या अनुषंगाने कुठलीही कार्यवाही झाली नव्हती म्हणुन पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रभाकर भांबरकर यांनी उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठामध्ये अॅड. एन. बी. नरवडे यांच्यामार्फत फौजदारी याचिका दाखल केलेली आहे.
या याचिकेच्या सुनावणीनंतर न्यायमुर्ती टी.व्ही.नलावडे व न्यायमुर्ती एस. जी. सेवलीकर यांनी संबंधीत प्रकरणामध्ये पोलीस अधिक्षक, जळगाव तसेच पोलीस अधिक्षक, अहमदनगर, पोलीस निरीक्षक अमळनेर, जि.जळगाव यांना नोटीसा काढण्याचे आदेश जारी केलेले आहेत. उच्च न्यायालयाने सदरील प्रकरणाची दखल घेऊन पोलीस अधिक्षक जळगाव व अहमदनगर तसेच पोलीस निरीक्षक अमळनेर पोलीस स्टेशन यांनी सदरील तक्रार अर्जाच्या अनुषंगाने काय कार्यवाही केली याचे पुर्ण रेकॉर्ड मागविले आहे. न्यायालयाना मयत सामाजिक कार्यकर्त्या ज्योती भोई यांच्या मृत्यु संदर्भातील सर्व रेकॉर्ड मागितले आहे. या कागदपत्रांची पाहणी करणे आवश्यक असुन सदरील प्रकरणामध्ये पोलीस अधिकार्यांच्या अशा पध्दतीच्या वागणुकीची दखल घेतली नाही तर समाजासाठी असे कृत्य घातक ठरु शकरते असेही नमुद केले आहे. या प्रकरणी संबंधीतांना नोटीसा बजावून खंडपीठासमोर १२ फेब्रुवारी रोजी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.