ज्येष्ठांचा सन्मान म्हणजे सर्वार्थाने देवपुजा

 

जळगाव, प्रतिनिधी । ” ज्येष्ठांचा सन्मान म्हणजे सर्वार्थाने देवपूजा ” असे भावनिक प्रतिपादन निवृत्त शिक्षक सुधाकर सोनवणे यांनी केले. आंतरराष्ट्रीय वृद्ध दिनानिमित्त तरसोद शाळेचे उपक्रमशील शिक्षक विजय लुल्हे यांनी आयोजित केलेल्या अनौपचारिक ज्येष्ठांचा सत्कार समारंभात सोनवणे मार्गदर्शन करीत होते.

ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त विजय लुल्हे यांनी कृतज्ञतापूर्वक आपल्या कर्मभुमी तरसोद गावातील सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात कतृत्व गाजविलेल्या ज्येष्ठांना सन्मानित केले. कोविड महामारीच्या भयग्रस्त वातावरणात त्यांनी निर्भयपणे घरी जाऊन शाल श्रीफळ व वाफ घेण्याचे मशीन सप्रेम भेट देऊन कर्तृत्वसंपन्न ज्येष्ठ नागरिकांचा आशिर्वाद घेतला. राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक भगवान देवरे यांच्या मातोश्री मैनाबाई देवरे (वय वर्षे ८५) तसेच माजी सरपंच मनीषा काळे यांच्या सासू गं.भा.कलावती काळे ( वय ६६ वर्ष )यांचा निवृत्त शिक्षक सुधाकर सोनवणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. निवृत्त आदर्श शिक्षक भास्करराव पाटील यांचा विजय लुल्हे यांच्या हस्ते शाल ,श्रीफळ व वाफेचे मशीन देऊन भावपुर्ण सत्कार करण्यात आला. .याप्रसंगी अमितबाई सावकारे , रजुभाई देवरे, छायाबाई अलकरी , अतुल अलकरी, आत्माराम सावकारे, मनोज काळे उपस्थित होते.

मार्गदर्शन करतांना सोनवणे पुढे म्हणाले की ,” भारतीय संस्कृती आणि परंपरा यानुसार आजच्या तरुण पिढीने त्यांच्या पुढील पिढीला सुसंस्कारीत केले नाही तर यापुढे फक्त नर आणि मादी ही दोनच नाती शिल्लक राहतील.” अनपेक्षित झालेल्या सत्कारामुळे ज्येष्ठ अतिशय सुखावले.आपल्या मनोगतात सत्कारार्थी आदर्श शिक्षक भास्कर पाटील म्हणाले की ,” बौद्धिक गर्विष्टता, उद्धटपणा व स्वार्थांधता हा आजच्या तरुण पिढीचा त्रिदोष आहे.” भारतीय संस्कृती, परंपरा यांचा त्यांना पदोपदी विसर पडतो याची तीव्र खंतही त्यांनी व्यक्त केली. विजय लुल्हे यांनी सामाजिक ऋण फेडतांना अप्रत्यक्षपणे संस्कृती संवर्धनाचेही काम करीत असल्याबद्दल त्यांनी प्रशंसा केली. याप्रसंगी सौ.बेबाबाई काळे,पुर्वा काळे उपस्थित होते.

Protected Content