नवी दिल्ली वृत्तसंस्था । ज्येष्ठ कामगार नेते जॉर्ज फर्नांडीस यांचे आज निधन झाले. गत अनेक वर्षांपासून ते अंथरूणाला खिळून होते.
ज्येष्ठ कामगार नेते जॉर्ज फर्नांडीस यांनी आज सकाळी शेवटचा श्वास घेतला. ते ८८ वर्षांचे होते. गत अनेक वर्षांपासून विस्मरणाच्या व्याधीमुळे ते जवळपास एकांतामध्येच होते. जॉर्ज फर्नांडीस हे कामगार नेतेदेखील होते. मुंबई बंद करण्याची ताकद कधी काळी त्यांच्यात होती. त्यांच्या नेतृत्वाखाली झालेला रेल्वेचा संपदेखील गाजला होता. फर्नांडीस यांनी समाजवादी विचारांचा झेंडा हाती घेऊन राजकीय कारकिर्द सुरू केली. देशाचे संरक्षणमंत्रीपददेखील त्यांनी भूषविले होते. सर्वात महत्वाची बाब म्हणजे राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजे एनडीएचे ते निमंत्रक होते.
जॉर्ज फर्नांडीस यांचा जन्म ३ जून १९३० रोजी झाला होता. त्यांचे आयुष्य हे अनेक चित्तथरारक घटनांनी भरलेले होते. मुंबईतील कामगार चळवळीचे ते प्रणेते होते. त्यांने अनेक संप गाजले होते. यातून त्यांनी लक्षावधी कामगारांना न्याय मिळवून दिला होता. १९६७ साली काँग्रेसचे तत्कालीन मातब्बर नेते स.का. पाटील यांचा पराभूत करण्याची किमया त्यांनी केली होती. याच माध्यमातून ते लोकसभेत पहिल्यांदा निवडून गेले. आणीबाणीच्या दमनपर्वात त्यांनी सत्ताधार्यांविरूध्द अतिशय आक्रमक भूमिका घेतली होती. यामुळे त्यांना कारागृहातदेखील जावे लागले होते. यानंतर राष्ट्रीय राजकारणात त्यांनी अतिशय मोलाची भूमिका पार पाडली. १९७७ साली ते जनता सरकारमध्ये उद्योग मंत्री होते. मात्र त्यांनी या मंत्रीमंडळातून राजीनामा दिला होता. नव्वदच्या दशकात त्यांची राजकीय कारकीर्द झळाळून निघाली. त्यांनी समता पक्षाचे स्थापनादेखील केली होती. वाजपेयी सरकारमध्ये संरक्षणमंत्री म्हणून त्यांनी उल्लेखनीय कामगिरी पार पाडली. यानंतर काही वर्षांनी त्यांना विस्मरणाचा त्रास सुरू झाला. अलीकडच्या काही वर्षांमध्ये तर ते एकांतवासात जीवन जगत होते. आज सकाळी दिल्लीतील मॅक्स रूग्णालयात त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने भारतीय राजकारणातील एक अध्याय काळाच्या पडद्याआड गेल्याचे मानले जात आहे.