जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील रामानंद नगर येथील जेष्ठ नागरिक मंडळाच्या वतीने ज्येष्ठांचे आरोग्य विषयक व कायदेविषयक कार्यशाळेचे आयोजन रविवारी ८ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता करण्यात आले. या कार्यक्रमाला माजी महापौर सीमाताई भोळे, माजी कुलगुरू पी.पी. पाटील, टेस्कॉमचे अध्यक्ष दत्तात्रय चौधरी, खानदेश प्रादेशिक विभागाचे अध्यक्ष जगतराव पाटील, बी.एम. पाटील यांच्यासह आदी ज्येष्ठ नागरिक व पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती मातेचे प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी महापौर सीमाताई भोळे यांच्याहस्ते फीत कापून कार्यशाळेला सुरूवात करण्यात आली. या कार्यक्रमांमध्ये ज्येष्ठ नागरिक धोरण कायदेविषयक मार्गदर्शन डी.टी. चौधरी, प्रा. अशोक पवार आणि एडवोकेट केतन सोनार यांनी मार्गदर्शन केले तर आरोग्य विषयक डॉ. रवी महाजन, डॉ.ज्योती गाजरे, डॉ. गणेश पाटील, डॉ. राहुल महाजन आणि डॉ. कुणाल झोपे यांनी मधुमेह रक्तदाब हृदयरोग, नेत्ररोग आणि दंतरोग याविषयी पूर्णपणे माहिती देवून जेष्ठांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ नागरिक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष गुलाबराव बाविस्कर यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष अवचित पाटील, सचिव रामचंद्र वानखेडे, सहसचिव पोपट नेमाडे, खजिनदार रमेश चौधरी यांच्यासह संचालक व कार्यकारी मंडळ यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी ८० वर्षावरील जेष्ठ नागरिकांचा येथे यथोचित सत्कार करण्यात आला. तसेच सोमवारी ९ जानेवारी रोजी सकाळी ७ ते दुपारी १२ वाजेपर्यंत ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात येणार आहे. अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष गुलाबराव बाविस्कर यांनी दिली.