भडगाव प्रतिनिधी । विविध मागण्यांसाठी स्वातंत्र्यदिनापासून उपोषणास बसलेल्या जुवार्डीच्या ग्रामस्थांची भेट घेऊन खासदार उन्मेष पाटील यांनी प्रदीर्घ चर्चा केली
या ग्रामस्थांनी स्वातंत्र्य दिनापासून उपोषणाला सुरुवात केली आहे. झेंडा वंदन करून दहा उपोषणकर्त्यानी उपोषणाला सुरुवात केली. उपोषणाच्या पहिल्या दिवशी माजी जि प सदस्य डॉ उत्तमराव महाजन यांनी उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांशी चर्चा केली व पाठिंबा दिला होता .
आज उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी उपोषणस्थळी खासदार उन्मेष पाटील ह्यानी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली. प्रा. राजेंद्र पाटील यांनी उपोषणकर्त्याच्या मागण्यासंदर्भात उन्मेष पाटील यांना अवगत केले. खा उन्मेष पाटील यांनी उपोषण स्थळावरूनच मागण्यासंदर्भात वनक्षेत्रपाल व उपवनसंरक्षक यांना फोनवरून संपर्क करून प्रश्न तात्काळ सोडविण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
अंगणवाडी बांधकामासंदर्भात बाल विकास अधिकारी राऊत यांच्याशी चर्चा करून अंगणवाडी बांधकामाच्या प्रश्नांबद्दलही चर्चा केली. जुवार्डी ते बहाळ रस्त्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून पन्नास लाख रुपये निधी मिळण्याची मागणी करणार असल्याचे व पालकमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. जुवार्डी आरोग्य उपकेंद्रासाठी कायमस्वरूपी आरोग्य सेवक नियुक्त करण्याची मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली.
ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना उन्मेष पाटील यांनी जलजीवन मिशन, मनरेगाविषयी मार्गदर्शन केले व विविध योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी प्रयत्न केले पाहिजेत असे सांगितले. यावेळी सरपंच यांचे पती गोरख ठाकरे व मोठया संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते,.
उपोषणस्थळी भडगाव पंचायत समितीचे माजी उपसभापती संभाजी भोसले यांनीही भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली.
प्रशासकीय अधिकाऱ्याकडून मागण्यासंदर्भात ठोस लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवणार असल्याचे उपोषणकर्त्यांनी यावेळी सांगितले