जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील गारखेडा गावात जुन्या वादाच्या कारणावरून दोन गटात भीषण हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या वादाचे रूपांतर दंगलीत झाले असून, आरोपींनी लोखंडी रॉड आणि काठ्यांच्या साहाय्याने एकाच कुटुंबातील पती-पत्नीसह त्यांच्या भावंडांना बेदम मारहाण केली आहे. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात ७ संशयितांविरुद्ध गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील गारखेडा गावात दिनेश सुदाम जाधव (वय ३०) आणि आरोपी यांच्यात जुन्या कारणावरून वाद सुरू होता. या वादातून १९ मार्च रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास, दिनेश जाधव हे आपल्या घरासमोर असताना संशयित आरोपी मुकेश शिवलाल बेलदार, लखन बाळू चव्हाण, सुखसेना शिवा बेलदार, शिवलाल मधुकर बेलदार, अरुणा लखन चव्हाण, प्रवीण शिवलाल बेलदार आणि लक्ष्मी मुकेश बेलदार यांनी हातातील लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्यांनी दिनेश जाधव, त्यांची पत्नी आरती, लहान भाऊ ज्ञानेश्वर, मोठा भाऊ गणेशकाका आणि आई अरुणाबाई यांच्यावर हल्ला चढवला.

या हल्ल्यात कुटुंबातील सदस्य गंभीर जखमी झाले आहेत. घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. जखमी झालेल्यांना जामनेर येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी हे करीत आहे.



