
अडावद-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । चोपडा तालुक्यातील वड्री गावात जुन्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणाला शिवीगाळ करत लोखंडी वस्तूने मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना २० एप्रिल रोजी दुपारी २.३० वाजता घडली आहे. याप्रकरणी अडावद पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्राने दिलेली माहिती अशी की, सुरेंद्र लोटन धनगर वय-३८, रा. तांदलवाडी ता. चोपडा हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्याची बहीण वड्री गावात दिलेली असल्याने सुरेंद्र हा बहिणीला भेटण्यासाठी २० एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजता वड्री गावात आला होता. दरम्यान जुन्या भांडणाच्या कारणावरून वड्री गावात राहणारा गोपाल राजू धनगर याने सुरेंद्र धनगर याला शिवीगाळ करत लोखंडीवस्तूने मारून गंभीर दुखापत केली आहे. दरम्यान ही घटना घडल्यानंतर जखमी सुरेंद्ला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी सोमवारी २२ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता मारहाण करणाऱ्या गोपाल राजू धनगर यांच्या विरोधात अडावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल नसेल तडवी करीत आहे.



