जळगाव प्रतिनिधी । मोठ्या भावाचे भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या दोघी भावंडांना दोन जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना पिंप्राळा हुडको येथे आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शेख इरफान शेख शाबीर (वय-२५) रा. दुध फेडरेशनजवळ, पिंप्राळा हा रिक्षा चालक आहे. त्याच्या मोठा भाऊ शेख सलमान शेख शबीर (वय-२८) याचे शेख शाहरुख शेख नुरा रा. मास्टर कॉलनी आणि शेख रईस शेख नुरा रा. गेंदालाल मिल यांच्या मागील करणावरून आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास पिंप्राळा हुडको येथे वाद सुरू होता. हा वाद सुरू असतांना रिक्षाचालक शेख इरफान हा रिक्षाने कामावर जात असतांना थांबला. मोठ्या भावाचा वाद असल्यामुळे मिटविण्याचा प्रयत्न करत असतांना शेख रईस आणि शेख शाहरूख यांना राग आल्याने शेख इरफान याला बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली. आवराआवर करतांना इरफानचा सावत्र भाऊ शेख अलिम शेख शाबीर याच्या हाताला दुखापत झाली. तर इरफानच्या डोक्याला दगड लागल्याने जखमी झाला. याप्रकरणी रिक्षा चालक शेख इरफान यांच्या माहितीवरून शेख शाहरूख शेख नुरा आणि शेख रईस शेख नुरा यांच्या विरोधात रामानंद नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.