जळगाव प्रतिनिधी | जुन्या भांडणाच्या वादातून सात ते आठ जणांनी तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना जुने हायवे रोड परिसरातील सह्याद्री नगरात रविवारी सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास घडली. यात तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.
मिळालेली माहिती अशी की, गेल्या महिन्यात गुजरात पेट्रोल पंपाजवळ दुचाकीचा कट लागल्याच्या कारणावरून दोन गटात वाद झाला होता. या वादातून गुणवंत संजय चव्हाण वय 28 सह्याद्रीनगर याला घराजवळ निमखेडी येथील अजय आणि बापू (पुर्ण नाव माहीत नाही) यांच्यासह सात ते आठ जणांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत गुणवंत हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेत तरुणाचा मोबाईल गहाळ झाला आहे. घटनेची माहिती कळताच तालुका पोलिस स्टेशनचे निरीक्षक दिलीप भागवत यांच्यासह इतर पोलिसांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेऊन जखमींना जवाब नोंदविला. याप्रकरणी जबाबावरून तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.