जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील रामानंदनगर येथील गिरणा टाकीजवळ जुगाराचा अड्ड्यावर रामानंदनगर पोलिसांनी छापा टाकून एकाला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून जुगाराचे साहित्य हस्तगत केले. याप्रकरणी गुरुवार २३ मार्च रोजी रामानंदनगर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव शहरातील रामानंदनगर परिसरात असलेल्या गिरणा टाकीजवळ सट्टा जुगाराचा खेळ सुरू असल्याची गोपनिय माहिती पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांना मिळाली. त्यानुसार गुरूवार २३ मार्च रोजी दुपारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास पोलीस ठाण्याचे पोहेकॉ संजय सपकाळे, पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र चौधरी, सुशील चौधरी आणि उमेश पवार यांनी कारवाई करत जुगार खेळणाऱ्या संशयित आरोपी चेतन गंगाराम वारके (वय-२९) रा. पार्वती नगर, रामानंदनगर, जळगाव याला जागेवर पकडले. त्याच्याजवळ काही रोकड आणि जुगार खेळण्याचे साहित्य आढळून आले. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी चेतन गंगाराम वारके यांच्यावर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कारवाईनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय सपकाळे करीत आहे.