जळगाव प्रतिनिधी । आज सयंकाळी आलेल्या रिपोर्टमध्ये जिल्ह्यात १४ नवीन कोरोना बाधीत आढळले असून यात भुसावळच्या १० तर जळगावच्या ४ रूग्णांचा समावेश असल्याची माहिती प्रशासनाने जाहीर केली आहे.
जिल्हा माहिती कार्यालयाने आज सायंकाळी एका प्रेस नोटच्या माध्यमातून कोरोना बाधितांबाबत माहिती जाहीर केली आहे. यानुसार-जिल्ह्यातील भुसावळ, जळगाव, पारोळा व चोपडा येथे स्वॅब घेतलेल्या 30 कोरोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल आज प्राप्त झाले आहे. यापैकी 16 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून चौदा व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.
पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील चार, भुसावळ येथील दहा रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 258 इतकी झाली असून त्यापैकी 45 व्यक्ती कोरोनामुक्त होऊन घरी गेल्या आहेत तर तीस कोरोना बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.
दरम्यान, भुसावळ येथील कोरोना बाधितांचे प्रमाण हे चिंताजनक पातळीवर पोहचल्याचे दिसून येत आहे. सध्या शहरात जनता कर्फ्यू पाळण्यात येत असून याला चांगला प्रतिसाद देखील मिळत असला तरी रूग्णांची संख्या वाढतच चालली आहे. दुपारी आलेल्या रिपोर्टमध्ये शहरातील ६५ नागरिकांचे रिपोर्ट निगेटीव्ह आल्याने भुसावळकरांना दिलासा मिळाला होता. तथापि, रात्री १० जण पॉझिटीव्ह आल्याने पुन्हा एकदा चिंता वाढली आहे.
अपडेट : रात्री उशीरा जिल्हा माहिती कार्यालयाने सुधारित प्रेस नोट जारी केली आहे. यात जळगाव येथील फक्त दोन रूग्ण असून ते आदर्श नगरातील रहिवासी आहेत. तर एक महिला ही धरणगावची असून दुसरा रूग्ण हा भुसावळचा आहे. यामुळे भुसावळातील ११, जळगावातील २ तर धरणगावातील १ असे एकूण १४ रूग्ण आज पॉझिटीव्ह आढळून आले आहेत.