पारोळा, प्रतिनिधी । मंगळवार २२ सप्टेंबर रोजी एरंडोल व भडगांव तालुक्यासह जळगाव जिल्ह्यात झालेल्या वादळासह पावसाने शेती पिकांचे तसेच ग्रामीण भागात घरांची पडझड झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून यांचे त्वरित पंचनामे करून नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी आमदार चिमणराव पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, कृषी मंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.
पारोळा,एरंडोल व भडगांव तालुक्यासह जळगाव जिल्ह्यात मंगळवार २२ सप्टेंबर रोजी झालेल्या वादळासह मुसळदार पावसामुळे कापूस, केळी, पपई, लिंबू तसेच सद्य स्थितीत शेतकऱ्यांच्या शेतात उभे असलेल्या पिकांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच ग्रामीण भागात ह्या वादळासह पावसाने घरांचीही मोठ्या प्रमाणावर पडझड होवून नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना ह्या मोठ्या संकटातून सावरण्यासाठी नुकसान भरपाई द्यावी लागेल. तसेच बहुतांश शेतकऱ्यांनी पीक विमे काढले असून पीक विम्याची रक्कम मिळण्यासाठी पंचनाम्याची गरज आहे. सर्व परिस्थिति पाहता बळीराजाला सावरण्यासाठी शेती पिकाचे झालेले नुकसान व ग्रामीण भागात पावसामुळे पडलेली घरे यांचे त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणीचे पत्र जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री, मदत व पुनर्वसन मंत्री, कृषी मंत्री यांना देण्यात आले आहे.