जळगाव प्रतिनिधी । बारावीचा निकाल नुकताच लागला. विद्यार्थ्यांना निकाल वाटप शुक्रवारी ३१ रोजी दुपारी ३ वाजेपासून करण्यात आले. मात्र शहरातील नूतन मराठा महाविद्यालय आणि मू.जे.महाविद्यालयात सकाळी ११ पासूनच गुणपत्रके वाटप करायला सुरुवात झाली होती.
यंदा बारावीचा जळगाव जिल्ह्याचा निकाल ८९.७२ इतका लागला आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे नाशिक विभागीय सचिव नितीन उपासनी यांनी २८ जुलै रोजी मुख्याध्यापकाना पत्र पाठवून गुरुवारी ३० रोजी गुणपत्रक नेणे आणि ३१ रोजी दुपारी ३ वाजेपासून विद्यार्थ्यांना आरोग्याचे नियम पाळून गुणपत्रक वितरीत करण्याच्या सूचना केल्या होत्या. शहरातील डॉ.बेंडाळे महाविद्यालय, नंदिनीबाई महाविद्यालय यासह २८ महाविद्यालयांत दुपारी गुणपत्रके वाटप झाली. विद्यार्थ्यांना शिक्षकांनी सामाजिक माध्यमांचा वापर करून गुणपत्रक घेऊन जाण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार पालक व विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांमध्ये गुणपत्रक घेण्यासाठी गर्दी केली होती. दरम्यान, नूतन मराठा महाविद्यालय आणि मू.जे.महाविद्यालयाने मात्र सकाळपासूनच गुणपत्रके वितरीत केली. अनेक ठिकाणी शारीरिक अंतर राखणे, मास्क वापरणे या नियमांचा सर्रास भंग झाला तर महाविद्यालयांनी देखील निर्जंतुकीकरणाची कुठलीच व्यवस्था न केल्याचे दिसून आले.