जळगाव प्रतिनिधी । कोरोना शिवाय अन्य व्याधीग्रस्तांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या अंतर्गत वेळेवर उपचार मिळावे म्हणून जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी बेड मॅनेजमेंट प्रणाली अंमलात आणण्याची घोषणा केली असून याची चार अधिकार्यांवर जबाबदारी सोपवली आहे.
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी विविधांगी उपाययोजना अंमलात आणण्यास प्रारंभ केला आहे. या अनुषंगाने आज एका परिपत्रकाच्या माध्यमातून त्यांनी जिल्ह्यासाठी बेड मॅनेजमेंट सिस्टीम अंमलात आणण्याचे जाहीर केले आहे. याच्या अंतर्गत लेखा परिक्षक अधिकारी अरविंद वसंतराव निचळ; लेखा परीक्षक नितीन आर. राणे; उपलेखा परीक्षक सुरेंद्र देविदास केदारे आणि लिपीक संजय बबन आंभोरे यांची सक्षम प्राधिकृत अधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे. या सर्वांवर बेड मॅनेजमेंटची जबाबदारी असणार आहे. याच्या अंतर्गत नॉन-कोविड रूग्णांना जिल्हा रूग्णालासह जिल्ह्यातील सरकारी आणि खासगी रूग्णालयांमध्ये वेळेत उपचार मिळावे यासाठी एक प्रणाली उभारण्यात येणार आहे. यात सरकारी व महात्मा फुले जनआरोग्य योजना असणार्या हॉस्पीटल्समध्ये नेमके किती बेड उपलब्ध आहेत याची दैनंदिन माहिती जमा करण्यात येणार आहे. यामुळे रूग्णांना आवश्यकतेनुसार सहजपणे बेड उपलब्ध करता येणार आहे.