जळगाव, प्रतिनिधी । जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादित जळगावची 103 वी वार्षिक सर्वसाधारण ऑनलाइन सभेत माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या निषेधाचा ठराव मंजूर करण्यात आला.
या सर्वसाधारण सभेत ॲड.विजय भास्कराव पाटील यांची सर्व सभासदांतर्फे सभेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. तसेच या सभेत एकूण आठ विषय सविस्तर चर्चा करून सर्वानुमते मंजूर करण्यात आले. यावेळी संचालक मंडळातर्फे सर्व सभासद बांधवांना वाढत असलेल्या कोरोना संबंधी काळजी घेण्याचे अवहान करण्यात आले.
गिरीश महाजन यांच्या निषेधाचा ठराव मंजूर
संस्थेतर्फे कुठलाही आयत्या वेळचा विषय नसताना सभासदां मधून विनोद पंजाबराव देशमुख यांनी आयत्या वेळचा विषय म्हणून गेल्या ३ वर्षापासून गिरीश महाजन यांनी ज्या पद्धतीने संस्थेच्या संचालक मंडळाला छळले व खोटे गुन्हे दाखल केलेत व संस्थेच्या मालकीची असलेली हजारो कोटींची मालमत्ता हडप करण्याचा प्रयत्न केला या सर्व बाबींचा जाहीर निषेधाचा ठराव मांडण्यात आला. या ठरावाला सर्व सभासदांनी एकमताने गिरीश महाजन यांचा निषेध नोंदवत मंजुरी दिली.