जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा केबल चालक-मालक संघटनेच्यावतीने विविध समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी गुरूवारी २३ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना निवेदन देण्यात आले आहे.
संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ट्राई च्या एनटीओ-३ दरच्या आदेशाने वाढलेल्या किंमती अनुसार नवीन करार न करणाऱ्या केबल चालक व मालक यांना सिग्नल ब्रॉडकॉस्ट बंद करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हाभरातील लाखो टीव्ही ग्राहकांच्या पॅकमधून आता मुख्य चॅनल बंद करण्यात आले आहे. यात डिज्नी, स्टार, झी आणि सोनी चॅनलचा समावेश आहे. केबल कंपन्यांनी शिखर संस्था ऑल इंडिया केबल फेडरेशन सांगितले की, नव्या करारामुळे टीव्ही पाहण्याचा खर्च ४० ते ४५ टक्क्यांनी वाढवून ग्राहकांवर बोजा पडेल. तसेच न्यायालयात प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने सिग्नल बंद करणे हे बेकायदेशीर आहे. त्यामुळे ग्राहकांवर अतिरिक्त बोजा पडू नये यासाठी शासनाने ठोस पाऊल उचलावित अशी मागणी निवेदनातून केली आहे. याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष विजय चंदेले यांच्यासह जिल्हाभरात केबल चालकांची उपस्थिती होती.