जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कारागृहात अटकेत असलेल्या मित्राला भेटण्यासाठी आलेल्या दोन मित्रांवर कारमधून दोघांनी तीक्ष्ण हत्याराने हल्ला करून गंभीर जखमी केल्याप्रकरणातील एकाला सिन्नर जि.नाशिक जिल्ह्यातून अटक केली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गणेश लक्ष्मीनारायण तलारे (वय-२७, रा. अशोक नगर वार्ड, भुसावळ) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.
पोलिस निरीक्षक अकबर पटेल यांच्याकडून मिळालेली माहिती अशी की, रामेश्वर कॉलनी येथील रहिवासी सनी बालकिसन जाधव हा मित्र रणजित इंगळे यांच्यासह ११ मे २०२० रोजी दुपारी ३ वाजता जिल्हा कारागृहात असलेला मित्र खुशाल मराठे याला भेटण्यासाठी आला होता. कारागृहाच्या गेटजवळ उभे असताना (एमएच ०२ सीडी ०७३७) क्रमांकाच्या कारमधून दोन तरूण आले व त्यातील एकाने सनी याला सांगितले की, आतमध्ये गांजा आणि चिवड्याचे पाकिट द्यायचे आहे. त्यावर सनी याने असे काही मध्ये देता येत नाही असे सांगितले. याचा राग येवून कारमधून आलेल्या त्या दोघांनी सनी व त्याच्या मित्रास शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. नंतर दोघांच्या पाठीवर, चेहऱ्यावर व हातावर तीक्ष्ण पट्टीने वार करून गंभीर जखमी केले. नंतर ते दोघे कारमधून पसार झाले़ याबाबत सनी याच्या जबाबावरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तीन पथक होते हल्लेखोरांच्या शोधार्थ
जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच, पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध सुरू केला होता़ नंतर त्यातील एक हल्लेखोर हा भुसावळ येथील असल्याची माहिती मिळताच भुसावळ पोलिसांच्या पथकानेही त्यांचा शोध सुरू केला़ त्यातच तो संशयित नाशिक येथे असल्याचे कळताच नाशिक पोलिसांचेही पथक त्याच्या मागावर होते. अखेर जिल्हापेठ, नाशिक व भुसावळ पोलिसांच्या पथकाच्या मदतीच्या सहाय्याने गणेश लक्ष्मीनाराण तलारे हा एक हल्लेखोराला नाशिक रोडवरील सिंदर फाट्याजवळ त्यास पकडण्यात पोलिसांना यश आले. दरम्यान, त्याचा दुसरा साथीदार हा अद्याप फरार असून पोलीस त्याच्या शोधार्थ आहे. तसेच पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली कारही जप्त केली आहे.