जामनेर प्रतिनिधी । शहरातील प्रकाश नगरात राहणाऱ्या तरूणीचा मृत्यू झाल्याप्रकरणी जबाबदार डॉक्टरावर गुन्हा दाखल करण्यासाठी हॉस्पिटलसमोर नातेवाईकांनी ठिय्या आंदोलन आज केले. ‘बेजबाबदार डॉक्टरला समोर आणा’ असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे.
अधिक माहिती अशी की, शहरातील प्रकाश नगरात राहणारी दिपाली अरूण चौधरी (वय-२२) ही तरूणी बी.फार्मसीचे शिक्षण घेत आहे. तिला गेल्या काही दिवसांपासून मानेवर चरबीची गाठ असल्याने शहरातील साई मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. गुरूवार ५ नोव्हेंबर २०२० रोजी तिच्यावर सायंकाळी ७ वाजता ऑपरेशन झाले. दरम्यान, तरूणीची शनिवारी तब्बेत खालावली होती. तिला शहरातील जी.एम. फाऊंडेशन हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पुन्हा प्रकृती अधिक बिघडल्याने आज सकाळी ९ वाजता औरंगाबाद येथे नेत असतांना सिल्लोड येथे रस्त्यातच मृत्यू झाला. संतप्त नातेवाईकांनी तरूणीचा मृतदेह साई हॉस्पिटलसमोर आणून ठेवला आहे. मृत्यूला जबाबदार असलेल्या डॉक्टरला समोर हजर करा असा पवित्रा नातेवाईकांनी केला. तर काहींनी हॉस्पिटलची तोडफोड केली. दरम्यान, घटनेची माहिती मिळतात स्थानिक पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली.