जामनेर, प्रतिनिधी | शहरातील माळी गल्लीत बंद असलेल्या घरांचे कुलूप तोडून अज्ञाताने लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
शहरातील माळी गल्लीत विनोद लोढा हे मोहन भवनात वास्तव्यास आहेत. दरम्यान लोढा हे परिवारासह घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले. मात्र याचाच फायदा अज्ञाताने घेऊन बंद घरांचे कुलूप तोडून घरातील लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीला आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पाचोरा उपविभागीय अधिकारी भारत काकडे, पोलिस निरीक्षक किरण शिंदे, पोलीस उपनिरीक्षक दिलीप राठोड यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. व हॅपी स्वान पथकाद्वारे पोलीस कॉन्स्टेबल संदीप परदेशी, मनोज पाटील यांनी तपासणी केली असता चोरट्यांनी चोरी करून घराबाहेर काही अंतरावर जाऊन चार चाकी वाहनाने निघून गेल्याचे निदर्शनात आले आहे. सदर घर मालक कुटुंबासह बाहेरगावी गेलेले होते. ते रात्री उशिरापर्यंत जामनेर शहरात न पोचल्याने सदर चोरीबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार दाखल झालेली नाही. यामुळे किती ऐवज चोरीला गेल्याचे स्पष्ट झालेले नाही. तत्पूर्वी गेल्या तीन दिवसांपूर्वीच शहरातील रस्त्यावर असलेल्या आयडीबीआय बँक एटीएम फोडून चोरट्यांनी बारा लाख रुपये चोरी केले होते. सदर तीन दिवसात दुसरी घटना घडल्यामुळे चोरट्याचे मनोबल वाढले असून मात्र दुसरीकडे शहरवासीयांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे शहरात पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून चोरट्याच्या बंदोबस्त करावा अशी मागणी आता नागरिकांकडून होत आहे.