जळगाव लाइव्ह ट्रेंडस न्युज । जळगाव शहरातील जाकीर हुसेन कॉलनीत राहणाऱ्या नलीनी विलास तायडे (वय-५०) यांच्या घरावर दगडफेक झाल्याची घटना २७ एप्रिल रोजी घडली. यावेळी गोळीबार झाल्याचा आरोपही नलीनी तायडे यांनी केला होता. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात दोन जणांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दगडफेक करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन सोमवार, २ मे रोजी नलीनी तायडे यांनी पोलीस उपअधीक्षकांना दिले आहेत.
महिलेच्या घरावर काहीही कारण नसतांना मध्यरात्री दोन जणांनी शिवीगाळ करून घरावर दगडफेक केली. तर दोन दुचाकीचे नुकसान केल्याची घटना बुधवार २७ एप्रिल रोजी रात्री २ वाजता घडली आहे. मुकेश उ र्फ रमेश बाविस्कर रा. वाल्मिक नगर, अश्विन शांताराम सोनवणे व राहूल शांताराम सोनवणे दोन्ही रा. एलआयसी कॉलनी जळगाव यांनी घरावर दगडफेक तसेच गोळीबार केल्याचा आरोप नलीनी तायडे यांनी केला आहे. संबंधित तीनही गुन्हेगार प्रवृत्तीचे असून त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या नावाने गुंडाच्या टोळया असून संबंधितांना राजकीय पक्षाचे सुध्दा पाठबळ आहे. तरी या तिघांमुळे माझ्या मुलांच्या जीवीतास धोका असून तिघांवर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन नलीनी तायडे यांनी पोलीस उपअधीक्षकांना दिले आहे. निवेदनावर नलीनी तायडे यांची स्वाक्षरी असून निवेदन पोलीस महासंचालक, मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनाही रवाना केले असल्याचे तायडे यांनी निवेदनात नमूद केले आहे.