जळगाव, प्रतिनिधी । शहरात मनपाच्या डॉ. डी. बी. जैन रुग्णालयात महापौर सौ. भारती सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत कोरोना प्रतिबंध लस ‘कोविशील्ड’ प्रथम डॉ. विजय घोलप यांनी देण्यात आली.
कोरोना लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून देण्यात आलेल्या सर्व निर्देशांचे पालन होते आहे की नाही याची देखील महापौरांनी माहिती घेतली. लसीकरणप्रसंगी डॉ. बी. एम. जैन रुग्णालयात महापौर सौ.भारती सोनवणे, स्थायी समिती सभापती राजेंद्र पाटील, मनपा आयुक्त सतिष कुलकर्णी, नगरसेवक कैलास सोनवणे, नवनाथ दारकुंडे, प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ.राम रावलानी, डॉ. संजय पाटील, डॉ. विजय घोलप, डॉ. सायली पवार, डॉ. नेहा भारंबे, डॉ. सोनल कुळकर्णी, डॉ. पल्लवी पाटील, डॉ. पल्लवी नारखेडे आदींसह सर्व रुग्णालय सेविका, कर्मचारी उपस्थित होते.
जळगाव मनपाचे चोख नियोजन
जळगाव शहरासाठी पहिल्या टप्प्यात १००० डोस उपलब्ध झालेले आहेत. प्रत्येक दिवशी चार टप्पे करून एका वेळी २५ लाभार्थ्यांना डोस देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मनपाच्या केंद्रावर सकाळी ११ वाजून १७ मिनिटांनी पहिला डोस देण्यात आला. लसीकरण केलेल्या व्यक्तीवर लक्ष ठेवण्यासाठी ४ डॉक्टर आणि १ भुलतज्ञ व कर्मचारी असे पथक आहे. प्रत्येक व्यक्तीला अर्धा तास निरीक्षणात ठेवण्यात येणार असून जर त्या व्यक्तीला खाज येणे, मळमळ होणे, चक्कर येणे, ताप येणे, सूज येणे असा काही त्रास झाल्यास तात्काळ उपचार करण्यात येणार आहे. तसेच त्या व्यक्तीला अधिक त्रास जाणवल्यास अगोदर ऍड्रीनालीन व हायड्रोकॉल्टीसॉल्ट हे इंजेक्शन दिले जाईल. रुग्णालयात ऑक्सिजन बेडची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे.
महिनाभराने दिला जाणार दुसरा डोस
कोरोना लसीकरण करताना सर्वप्रथम आरोग्य कर्मचारी, त्यानंतर पहिल्या फळीत काम करणारे कामगार आणि त्यानंतर सर्वसामान्यांना लस दिली जाणार आहे. लसीकरणासाठी लाभार्थ्याची एक दिवस अगोदर नोंदणी केली जाते. त्यासाठी ओळखीचा पुरावा घेतला जाऊन सॉफ्टवेअरमध्ये माहितीची नोंदणी करण्यात येते. लसीकरण झाल्यावर संबंधीत व्यक्तीला मोबाईलवर संदेश येतो आणि एक प्रमाणपत्र देखील पाठविण्यात येते. लाभार्थ्याला माहिन्याभराने दुसरा डोस देण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी, महापौरांनी घेतला आढावा
मनपाच्या डी. बी. जैन रुग्णालयात महापौर सौ.भारती सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत लसीकरणाला सुरुवात करण्यात आल्यानंतर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी देखील येऊन आढावा घेतला. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, महापौर सौ.भारती सोनवणे, पोलीस अधीक्षक डॉ.प्रितम मुंढे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन. एस. चव्हाण यांनी सर्व लसीकरणाच्या प्रक्रियेची माहिती जाणून घेतली.
https://www.facebook.com/508992935887325/videos/853675651877047