जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी शिंदे गटाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पॅनलचा पराभव केला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीने १८ पैकी ११ जागांवर विजय मिळवून भाजपा-शिंदे गट युतीचा दणदणीत पराभव केला. दरम्यान जळगाव कृषि उत्पन्न बाजार समितीतील हा पराभव पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
जळगाव कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा निकाल आज अत्यंत धक्कादायक ठरला. या निवडणुकीसाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. भाजपा आणि शिंदे गटाने युती करून ही निवडणूक लढविली. तर दुसरीकडे महाविकास आघाडीनेही युतीला कडवे आव्हान दिले होते. सकाळी पहिला निकाल हा अनूसुचित जाती जमाती मतदारसंघाचा जाहीर करण्यात आला. यात महाविकास आघाडीचे दिलीप कोळी ३२९ मते घेत युतीच्या उमेदवार ललिता कोळी यांचा दणदणीत पराभव करून विजयाचे खाते उघडले. जळगाव कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने ११ जागा मिळवून सत्ता खेचून आणली. राष्ट्रवादीचे नेते गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वाखाली मविआच्या उमेदवारांनी नियोजनावर भर दिल्याने निवडणुकीत त्याचे चांगले परिणाम दिसले. पालकमंत्र्यांच्या ताब्यात असलेली बाजार समिती महाविकास आघाडीने खेचून पालकमंत्र्यांना मोठा धक्का दिला आहे.