जळगाव- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्ह्यात फेब्रुवारीच्या मध्यापासूनच उन्हाची तीव्रता जाणवून येत आहे. वाढत्या तापमानामुळे तसेच सिंचनासाठी वा ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्यासाठी पाण्याचे आवर्तन सोडण्यात येत आहे. त्यामुळे प्रकल्पातील प्रकल्पीय पाणीसाठ्यात घट होत असल्याचे दिसून येत आहे. यावर्षी मान्सूनची बऱ्यापैकी होणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असली तरी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची आवश्यकता असल्याचे बोलले जात आहे.
गेल्या तीन मान्सून काळापासून जिल्ह्यात बऱ्यापैकी पर्जन्यमानामुळे जिल्ह्यातील प्रकल्पीय पाणीसाठा बऱ्यापैकी आहे. जिल्ह्यातील ३ मोठ्या तसेच मध्यम व लघू प्रकल्पात सद्यस्थितीत ६३.५१ टक्के पाणीसाठा आहे. तसेच गिरणा प्रकल्पातून पिण्याच्या पाण्यासह सिंचनासाठी तिसरे आवर्तन सुरु आहे. गेल्या दोन वर्षात उन्हाळ्याची तीव्रता जाणवली नसली तरी यावर्षी फेब्रुवारी पासूनच उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच बेमोसमी पावसाचे प्रमाण यावर्षी कमी आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांसाठी मे अखेर सिंचनासाठी पाण्याची आवश्यकता भासणार असल्याचे चित्र आहे.
गिरणा प्रकल्पातून चार आवर्तने
गिरणा प्रकल्पातून दरवषी तीन आवर्तने सोडण्यात येत होती, यावर्षी पालकमंत्र्यांच्या पाणी आरक्षण समितीच्या झालेल्या बैठकीत सिंचन आणि पिण्याच्या पाण्यासाठी किमान ४ आवर्तन सोडण्याचे निश्चीत करण्यात आले आहे. जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी शहरी भागात किमान २ ते ४ दिवसानंतर पाणीपुरवठा केला जात आहे. काही ठिकाणी यात तफावत आहे. जिल्ह्यातील प्रकल्पात पाणीसाठा गेल्यावर्षीपेक्षा बऱ्यापैकी असला तरी शहरी भागात बरेचसे नागरिक वाहने धुण्यासाठी वा अंगणात पाणी मारण्यासाठी वापर करित आहेत. तसेच संसर्ग प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षापासून नव्याने बांधकामे बंद होती. यावर्षी ही रखडलेली बांधकामे सर्वाधिक प्रमाणात सुरु आहेत. त्यांमुळे या बांधकामांसाठी बोअरवेलचा वापर देखील मोठ्या प्रमाणात होत असल्याने भूगर्भातील पाणीसाठा उपसा प्रमाणात वाढ झाली आहे.
गेल्या वर्षी होता ५४.११ टक्के पाणीसाठा
जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांपैकी गिरणा ५६.१२, हतनूर ७०.७८ आणि वाघुर ८८.५२ सरासरी ६७.६७ टक्के असा पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी मोठ्या प्रकल्पात ५८.९९ टक्के तर लघु वा मध्यम प्रकल्पात ५४.११ टक्के अशी स्थिती होती, परंतू उन्हाळ्याची तीव्रता कमी प्रमाणात होती.