जळगाव प्रतिनिधी । शहरातील गेंदालाल मिल परिसरात एका तरूणावर चॉपर हल्ला केल्याच्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या कैद्याचा जिल्हा कारागृहात संशयास्पद मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना आज दुपारी घडली. याप्रकरणी नशिराबाद पोलीसात अकस्मात नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, सायंकाळी मृतदेहा शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात शवविच्छेदनासाठी आणल्यानंतर कुटुंबियांनी एकच आक्रोश केला.
सविस्तर माहिती अशी की, शहरातील गेंदालाल मिल परिसरातील लकी जितेंद्र पवार हा त्याच्या मावस भाऊ आर्यशील उर्फ सोनू दिलीप अहिरे हे दोघ शिवजीनगर हुडको भागात ६ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता बिर्याणी खाण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी उभा असलेला चिन्या उर्फ रविंद्र जगताप याने या दोघांना तुम्ही याठिकाणी मुली बघण्यासाठी येता का असे म्हणत चिन्यासह तीन ते चार जणांनी त्या दोघांना शिवीगाळ करुन त्यांना मारहाण केली हेाती. नंतर त्या दोघांनी काही तरूणांना बोलवून आणले. मात्र पुन्हा वाद होवून त्यातील एकावर चॉपर हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी चिन्यासह काही जणांविरूध्द गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी चिन्या याला अटक केल्यानंतर त्यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. गेल्या दोन तीन दिवसांपासून तो जिल्हा कारागृहात होता.
शुक्रवारी सकाळी १० वाजता चिन्या याची पत्नी टिना व मुलगा साई हे दोघं त्यास भेटण्यासाठी जिल्हा कारागृह आवारात आले. मात्र, त्याची तब्बेत बरी आहे, असे सांगून त्यांना घरी जाण्यासाठी सांगितले. नंतर कुटूंबीय घरी निघून गेले. मात्र, दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास अचानक चिन्या याचा कारागृहात मृत्यू झाला. त्यास तात्काळ उल्हास पाटील रूग्णालयात नेण्यात आले. वैद़यकीय तपासणीअंती त्यास मृत घोषित करण्यात आले. दुपारी ४ वाजता परिसरातीलच काही व्यक्तींनी चिन्याच्या कुटूंबीयांना संपर्क साधून मृत्यू झाल्याची माहिती दिली. कुटूंबीयांनी घरातच हंबरडा फोडत डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात धाव घेतली.
सायंकाळी शासकीय वैद़यकीय महाविद़यालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी आणल्यानंतर कुटूंबीयांसह शिवाजीनगर भागातील रहिवाश्यांनी त्याठिकाणी एकच गर्दी केली होती. चिन्या याच्या अंगावर असलेले कपडे फाटलेल्या अवस्थेत होते. त्यातच वडीलांचा मृत्यू हा मारहाणीतून झाला असून त्यांच्या अंगावर जखमा असल्याचा आरोप मुलगा साई याने करित इनकॅमेरा शवविच्छेदन करण्याची मागणी केली. त्यावेळी कुटूंबीयांसह नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला होता. तसेच सकाळी पतीला कारागृहातील पोलिसांनी भेटू दिले नाही असा आरोप पत्नी टिना यांनी केला असून पतीचा मृत्यू हा पोलिसांना कारागृहात केलेल्या मारहाणीत झाल्याचा आरोपही मयताच्या पत्नी टिना जगताप यांनी केला आहे.
चिन्या उर्फ रविंद्र रमेश जगताप याच्या मृत्यू प्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात सीएमओ श्रीकांत जाधव यांच्या िफर्यादीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास सहायक पोलीस निरिक्षक प्रविण साळुंखे करीत आहे.