जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आजोंबाच्या अंत्यविधी निघालेल्या महिला वकीलाची जळगावातील नवीन बसस्थानकात जामनेरच्या बसमध्ये चढताना चोरट्याने पर्स लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी गुरूवारी 8 डिसेंबर रोजी रात्री जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, प्रताप नगर येथील ॲड. ज्योती सुरवाडे यांचे आजोबा मयत झाल्याने जामनेर जाण्यासाठी मंगळवारी 6 डिसेंबर रोनी दुपारी ३ वाजता त्या नवीन बसस्थानक येथे आल्या होत्या. जामनेर बसमध्ये चढत असताना चोरट्याने गर्दीचा फायदा घेऊन त्यांच्या हातातील पर्स लांबविली. काही वेळानंतर त्यांना पर्स गायब झाल्याची दिसून आली. त्यांनी लागलीच ही घटना बस व्यवस्थापक यांना सांगितली. नंतर सीसीटीव्ही फुटेज तपासले. मात्र, त्यात काहीही आढळून आले नाही. अखेर गुरूवारी 8 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजता जिल्हापेठ पोलिस ठाण्यात येऊन तक्रार दिली. त्यानुसार ९ हजार रूपये किंमतीची सोन्याची अंगठी व दोन हजारांची रोकड असे एकूण ११ हजार रूपयांचा ऐवज असलेली पर्स लांबविल्याप्रकरणी चोरट्याविरूध्द जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.