जळगाव प्रतिनिधी । हरवलेल्या बालकांना शोधण्यासाठी पोलिस दलातर्फे १ ते ३१ डिसेंबर पर्यंत ‘ऑपरेशन मुस्कान ७’ ही विशेष मोहिम राबवण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालय, केंद्रीय गृहमंत्रालय व महिला बाल अत्याचार प्रतिबंध विभाग, मुंबई यांच्या आदेशाने ही मोहिम राबवण्यात येते आहे.
मुलांचे आश्रयगृह, अशासकीय संस्था, रेल्वेस्थानक, बसस्थानक, रस्त्यात भिक मागणारी, वस्तु विकणारी, कचरा गोळा करणारी मुले, धार्मीक स्थळे, रुग्णालय, हॉटेल, दुकाने इत्यादी ठिकाणी काम करणाऱ्या मुलांना हरविलेली मुले समजुन त्यांचे फोटो घेवुन त्यांची अद्यायावत माहीती तयार करण्यात येणार आहे. तसेच या कालावधीत सापडलेल्या मुलांची माहीती घेवून त्यांचे आई-वडील, पालक याच्याकडे सुपुर्द करण्यात येणार आहेत. वेळोवेळी अश्या मुलांची छायाचित्र प्रसार माध्यमांद्वारे प्रसिद्धीस देण्यात येणार आहेत. या मोहीमे दरम्यान हरविलेल्या जास्तीत-जास्त बालकांचा शोध घेण्यात येवुन त्याचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. ही मोहीम जिल्ह्यात सर्व पोलीस ठाण्यांमार्फत राबविण्यात येणार आहे. या मोहीमेस कोणी शासकीय, अशासकीय सामाजिक संस्था मदत करण्यास इच्छुक असल्यास स्थानिक गुन्हे शाखा कार्यालयास संपर्क साधावा असे कळवण्यात आले आहे. पाेलिस अधिक्षक डॉ.पंजाबराव उगले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापु रोहोम, सहायक पोलीस निरीक्षक निता कायटे, दादाभाऊ पाटील, दतात्रय बडगुजर, छाया मराठे, वहीदा तडवी व जिल्ह्यातील केशवस्मृती प्रतिष्ठाण अंतर्गत समतोल प्रकल्प, जननायक संस्था यांचे मोहिमेत सहकार्य असणार आहे. मोहीमेदरम्यान जळगांव जिल्ह्यातील एकुण हरविलेल्या व सापडलेल्या बालकांची माहीती तयार करण्यात येवुन त्याचा डाटाबेस तयार येणार आहे. हा डाटा www.TRACKTHEMISSINGCHILD.IN या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आला आहे.