जळगावात दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचे आयोजन (व्हिडीओ)

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |   राज्य शासनाचा उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्यातर्फे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुहास रोकडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुहास रोकडे यांनी पुढे सांगितले की, जळगावात  ग्रंथोत्सव-२०२२ आयोजन दि. २८  व २९  नोव्हेंबर रोजी करण्यात आले आहे. या ग्रंथोत्सवात ग्रंथप्रदर्शन व विक्री, तसेच परिसंवाद, कविसंमेलनासह विविध साहित्यिक कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. हा  ग्रंथोत्सवाव महाबळ परिसरातील जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय आवारातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात दोन दिवस होणार आहेत. सोमवार दि. २८ नोव्हेंबर रोजी सकाळी नऊला ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे. ग्रंथदिंडीचे पूजन महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते होणार  आहे. यावेळी ग्रंथदिंडी सागर पार्क ते जिल्हा ग्रंथालय कार्यालय अशी निघणार आहे.  ग्रंथोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होणार आहे. ग्रामविकास, पंचायत राज व वैद्यकीय शिक्षणमंत्री ना. गिरीश महाजन अध्यक्षस्थानी असतील. प्रमुख अतिथी म्हणून महापौर जयश्री महाजन, खा. रक्षा खडसे व उन्मेष पाटील, आमदार एकनाथ खडसे,  ग्रंथालय संचालनालयाचे संचालक दत्तात्रेय क्षीरसागर,  सहाय्यक ग्रंथालय संचालक सचिन जोपुळे आदी उपस्थिती राहणार आहेत.

सोमवार दि. २८  नोव्हेंबर रोजी दुपारी दोन ते चार या वेळेत होणार्‍या पहिल्या सत्रात ताणतणाव व्यवस्थापन या विषयावर व्याख्यान होईल. प्रमुख वक्ते मानसतज्ज्ञ नितीन विसपुते असतील. ज्येष्ठ पत्रकार हेमंत अलोने अध्यक्षस्थानी असतील. जिल्हा कोषागार अधिकारी शरद निकुंभ यांची प्रमुख उपस्थिती राहील. दुपारी चारपासून सुरू होणार्‍या दुसर्‍या सत्रात खानदेशी बोलीभाषा कविसंमेलन होणार असून, ते सर्वांसाठी खुले असणार आहे.  अशोक कोतवाल अध्यक्षस्थानी असतील. अशोक सोनवणे, प्रा. वा. ना. आंधळे, अ. फ. भालेराव, डॉ. अशोक कोळी, डॉ. सत्यजित साळवे, डॉ. अस्मिता गुरव, बी. एन. चौधरी, डॉ. मिलिंद बागूल, माया धुप्पड, प्रा. डॉ. रमेश माने, सुखदेव वाघ, विजय लुल्हे यांची प्रमुख उपस्थिती राहील. सहभागी कवींना सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे. कविसंमेलनासाठी नावनोंदणी आवश्यक असून, त्यासाठी सुनील जगताप (9921351982) यांच्याशी संपर्क साधावा.

मंगळवार दि. २९ नोव्हेंबर रोजी ग्रंथोत्सवांतर्गत सकाळी अकरा ते दुपारी एक या वेळेत होणार्‍या प्रसारमाध्यमांचा वाचनसंस्कृतीवर होणारा परिणाम या विषयावरील परिसंवादात ज्येष्ठ पत्रकार दीपक पटवे, दिनेश दगडकर, विकास भदाणे, शेखर पाटील, मू. जे. महाविद्यालयाचे ग्रंथपाल विजय कंची यांचा सहभाग होणार आहेत. दुपारी दोन ते चार वेळेत होणार्‍या दुसर्‍या सत्रात थोडं बसा आणि भरपूर हसा… हा हास्यरंग कार्यक्रम होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार रवी टाले अध्यक्षस्थानी असतील. औरंगाबाद येथील प्रा. डॉ. विष्णू सुरासे हे कार्यक्रम सादर करतील. त्यानंतर ग्रंथोत्सवाच्या समारोपात प्रमाणपत्र वितरण, सत्कार सोहळा होणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून निवासी जिल्हाधिकारी राहुल पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांची उपस्थिती राहील. ग्रंथोत्सवातील साहित्यिक कार्यक्रमांना उपस्थितीचे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुहास रोकडे यांनी केले आहे. ग्रंथप्रदर्शन व विक्री २८  व २९ नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी सातपर्यंत सर्वांसाठी खुले आहे.

Protected Content