जळगाव प्रतिनिधी । ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांचा आज अमृतमहोत्सवानिमित्त सत्कार करण्यात आला आहे.
ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधून राज्यभरात ठिकठिकाणी त्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात येत आहे. या अनुषंगाने जळगावातही डॉ. साळुंखे यांचा सत्कार करण्यात आला. शहरातील कांताई सभागृहात सध्या सुरू असणार्या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी डॉ. साळुंखे यांचा हृद्य सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील, कविवर्य ना.धो. महानोर, उमविचे प्रथम कुलगुरू डॉ. एन.के. ठाकरे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
सत्कारला उत्तर देतांना डॉ. साळुंखे यांनी विविध विषयांना स्पर्श केला. विशेष करून त्यांनी इतिहासातील एकांगी चित्रीकरणावर टीका केली. ते म्हणाले की, बखरकारांनी इतिहासाचे एकांगी चित्रण केले. मानवी बुद्धीची चिकित्सा ९५ टक्के लोकांनी केली नाही. अडीच हजार वर्ष ९५ टक्के प्रतिभेचा मोहर झडून गेला. त्याचा हिशोब कसा करणार? पुढच्या पिढ्यांचा प्रतिभेचा मोहर झडू न देण्यासाठी जागरूक रहावे लागेल. तो झडून जाण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी तरूण पिढीत चिकित्सक दृष्टीकोन निर्माण करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन डॉ.आ.ह.साळुंखे यांनी केले.