जळगाव प्रतिनिधी । शहरातील क्रिडा अधिकाऱ्याचे बंद घर फोडून घरातील रोकडसह सोन्याचे दागीने असा एकुण २ लाख रूपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याचा घटना आज सकाळी उघडकीला आली आहे.
अधिक माहिती अशी की, क्रिडा अधिकारी सुजाता गंगाधर चव्हाण (५२) या युवा सप्ताहांतर्गत युवा दिनानिमित्त मू.जे. महाविद्यालयात शासकीय कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभात असतानाच दुसरीकडे त्याचवेळी त्यांच्या जिल्हा परिषद कॉलनीतील निवासस्थानात दोन लाखाची घरफोडी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली.
सुजाता चव्हाण या जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालयात क्रिडा अधिकारी पदावर कार्यरत आहेत. पती राजेंद्र हनुमंत चव्हाण हे सेवानिवृत्त झालेले आहेत. जिल्हा परिषद कॉलनीत माजी जिल्हा परिषद सदस्या उषा बाळासाहेब परखड यांच्या मालकीच्या घरात भाड्याने वास्तव्याला आहेत. मंगळवारी युवा सप्ताहांतर्गत युवा दिनानिमित्त मू.जे.महाविद्यालयात शासकीय कार्यक्रमाचे उद्घाटन असल्याने त्या पतीसह सकाळी १०.१५ वाजता घरुन निघाल्या. कार्यक्रम संपल्यानंतर त्या जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालयात गेले. तेथून ३.४५ वाजता जेवणासाठी घरी आल्या असता घराचा दरवाजा अर्धवट उघडा होता तर पंखा सुरुच होता. बेडरुमधील कपाटाचे ड्रावर पलंगावर पडलेले होते. तसेच ड्रावरमधील सोन्याचे दागिने गायब झालेल्या होते. त्यात ४० हजार रुपये किमतीची ८ ग्रॅमची सोन्याची अंगठी, १ लाख रुपये किमतीच्या दहा ग्रॅमच्या सोन्याच्या अंगठ्या, ५० हजार रुपये किमतीची १० ग्रॅमची एक सोन्याची अंगठी, ३ हजार रुपये किमतीची सोन्याची एक नथ व १ हजार रुपये किमतीची चांदीची अंगठी असा १ लाख ९३ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी लांबविल्याचे उघड झाले. दरम्यान, या घटनेनंतर सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा, जिल्हा पेठचे निरीक्षक विलास शेंडे, सहायक निरीक्षक महेंद्र वाघमारे व महेंद्र बागुल यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी व पंचनामा केला.