जळगाव प्रतिनिधी । शहरातील वाल्मिक नगरातील आरोदा रोडवर असलेली पान टपरी अज्ञात चोरट्यांनी फोडून दुकानातील किरकोळ माल लंपास केल्याचे आज सकाळी उघडकीस आले. विशेष म्हणजे १५ दिवसात तिसऱ्यांदा पान टपरी फोडली आहे. शनीपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी की, भरत चंपालाल दरडेकर (वय-२७) रा. वाल्मिक नगरजवळ हरी ओम नगर यांची आसोदा रोडवरील रेल्वे फाटकाजवळ पान टपरीचे दुकान आहे. गेल्या पाच ते सहा वर्षांपासून पान टपरी चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. नेहमीप्रमाणे ८ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजता पान टपरी बंद केली. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी बंद पान टपरी फोडून दुकानातील कुरकुऱ्यांचे पाकीट आणि लहान फ्रिजचे नुकसान करून फ्रिजमधील पाण्याच्या बाटल्या लंपास केल्या. सकाळी दुकान उघडण्यासाठी गेल्यानंतर पान टपरीत चोरी झाल्याचे दिसून आले.
दरम्यान गेल्या १५ दिवसात तिसऱ्यांदा पान टपरी अज्ञात चोरट्यांनी फोडली असल्याची माहिती टपरी मालक भरत दरडेकर यांनी सांगितले. याप्रकरणी भरत दरडेकर यांनी चोरी केल्याप्रकरणी शनी पेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.