जळगाव, प्रतीनिधी । इको फ्रेंडली, विजेवर चालणारे तसेच अत्याधुनिक सुविधा असलेले असे चारचाकी वाहन “इलेक्ट्रिक कार्ट” शहरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील “टीम गरुडा”च्या विद्यार्थानी बनवले आहे. हे वाहन आता तामिळनाडू राज्यातील कोईम्बतूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत उतरणार असून जळगावचे नाव उंचावले जाणार आहे.
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील एकूण ३० विद्यार्थ्यांनी गेल्या सहा महिन्यांपासून चारचाकी वाहन बनविण्यासाठी पारिश्र घेतले आहेत. प्रथम डिझाईन बनवून झाल्यानंतर वाहनाच्या विविध चाचण्या घेण्यात आल्या. तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन घेत विद्यार्थ्यानी अखेर “इलेक्ट्रिक कार्ट” हे वाहन तयार केले आहे. या वाहनाचे वैशिष्य म्हणजे इको फ्रेंडली असून कमी वीज वापरून त्याची बेटरी चार्ज करता येणार आहे. ३ किलोव्हेट डीसीची मोटर आहे. कोईम्बतूर येथे देशातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची आयएसएनईई संस्था इंडिया आयोजित “गो कार्ट डिझाईन चेलेंज” हि स्पर्धा दि. १० ते १४ फेब्रुवारी दरम्यान होत आहे. यात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी “इलेक्ट्रिक कार्ट” घेऊन सहभागी होणार आहे. या विद्यार्थ्यांना प्रा.एम.बी.भोरे, प्रा.एस.जी.कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. स्पर्धेसाठी प्राचार्य डॉ.आर.डी.कोकाटे, विभाग प्रमुख डॉ.एम.जे.साबळे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.