जळगाव, प्रतिनिधी । लॉकडाऊन संपल्यानंतर ग्राहकांना गंडविण्यासाठी ठगांनी नवीनच शक्कल लढवली असून कमी किमतीत दुचाकी वाहने मिळवून देण्याच्या बहाण्याने नागरिकांची फसवणूक सुरू केली आहे. जळगाव शहरात पोलिसांनी काही वाहने पकडल्यानंतर ठगांनी नवीनच फंडा सुरू केला आहे. कमी किमतीच्या बहाण्याने नागरिकांकडून आगाऊ रक्कम घेतली जात असून २५ दिवसांनी वाहन देण्याची बतावणी केली जात आहे. जळगावकरांनी आमिषाला बळी न पडता सावधान रहावे, असे आवाहन जळगाव जिल्हा वाहन विक्रेत्यांनी केले आहे.
जळगाव शहरात अंडर कटिंगच्या नावाखाली काही वाहने आणून विक्री केली जाणार असल्याची माहिती दुचाकी डिलर्सला मिळाली होती. एमआयडीसी पोलिसांना त्यांनी याबाबत तक्रार केल्यावर पोलिसांनी मोठ्याप्रमाणात वाहने पकडली होती.
आगाऊ रक्कम घेऊन वाहन नोंदणी
एक डाव फसल्यानंतर ठगांनी नवीन शक्कल लढवली आहे. जळगाव जिल्ह्यात सध्या कमी किमतीत दुचाकी वाहन देण्याच्या नावाखाली ग्राहकांना फसवणारी टोळी कार्यरत झाली आहे. ग्राहकांना आमिष दाखवून दुचाकीच्या नावाखाली २० ते ३० हजार आगाऊ उकळले जात असून २५ दिवसांनी वाहन देण्याची बतावणी केली जात आहे. जिल्ह्यात अनेक नागरिक या टोळीच्या बोलबच्चनमध्ये अडकले असण्याची शक्यता आहे.
ग्राहकांनी आमिषाला बळी पडू नये
जळगाव जिल्ह्यात कार्यरत असलेल्या या टोळीचा एक डाव आम्ही हाणून पाडला आहे. ग्राहकांनी कमी किमतीच्या आमिषाला बळी पडून स्वतःची फसवणूक होऊ देऊ नये. कोणत्याही कंपनीने नियुक्त केलेल्या अधिकृत वाहन डीलरकडूनच वाहन खरेदी करावे. जिल्ह्यातील कोणत्याही नागरिकाची टोळीकडून फसवणूक केली असल्यास त्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन राम होंडाचे प्रकाश जाखेटे, सातपुडा ऑटोमोबाईलचे किरण बच्छाव आणि पंकज टिव्हीएसचे अशोक चौधरी यांनी केले आहे. जिल्ह्यात सक्रिय झालेल्या या टोळीबाबत पोलिसांना देखील माहिती दिल्याचे त्यांनी कळविले आहे.