जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील नागरिकांना सर्व प्रकारच्या पॅथलॉजिकल, रेडिओ लॉजीकल तपासण्या अल्पदरात करून मिळाव्या यासाठी जी.एम.फाऊंडेशन, ओम साई ग्रामीण फाऊंडेशन आणि जळगाव मनपाच्या सौजन्याने अत्याधुनिक लॅब उभारण्यात आली असून १ जून पासून लॅबचे लोकार्पण करण्यात येईल अशी माहिती माजी पालकमंत्री आ.गिरीष महाजन यांनी दिली आहे.
शहरातील मनपाच्या नानीबाई हॉस्पिटलमध्ये साकारण्यात येत असलेल्या जी.एम.हेल्थकेअर लॅबची माजी मंत्री आ.गिरीष महाजन यांनी मंगळवारी पाहणी केली. जळगाव जिल्हावासियांच्या सेवार्थ जळगावात अत्याधुनिक लॅब तयार करण्यासाठी माजी मंत्री आ.गिरीष महाजन, आ.राजुमामा भोळे, आ.चंदूभाई पटेल, नगरसेवक भगत बालाणी, कैलास सोनवणे पाठपुरावा करीत होते. लॅबचे काम प्रगतीपथावर आले असून अंतिम टप्प्यात असल्याने आ.महाजन यांनी पाहणी करून आढावा घेतला. यावेळी महापौर सौ.भारती सोनवणे, आ.चंदूभाई पटेल, आ.राजुमामा भोळे, स्थायी समिती सभापती ऍड.शुचिता हाडा, नगरसेवक कैलास सोनवणे, अमित काळे, मुकुंदा सोनवणे, अतुलसिंग हाडा, मनोज काळे, आरोग्यदूत रामेश्वर नाईक, अरविंद देशमुख, पितांबर भावसार, होनाजी चव्हाण आदी उपस्थित होते.
अत्याधुनिक सुविधा, अल्पदरात तपासण्या
जी.एम.हेल्थकेअर लॅबसाठी जळगाव मनपाने जागा उपलब्ध करून दिली असून ओमसाई ग्रामीण फाऊंडेशन, औरंगाबादच्या सौजन्याने लॅब साकारण्यात येत आहे. लॅबचे सर्व नियोजन जी.एम.फाऊंडेशनमार्फत केले जाणार आहे. अत्याधुनिक लॅबमध्ये सर्व प्रकारच्या पॅथलॉजिकल, रेडिओलॉजिकल तपासण्या, रक्त तपासणी, हिस्टो पॅथलॉजिकल, बायो केमिस्ट्री तपासणी, सीटी स्कॅन, एक्स रे, टू डी इको हे केंद्र शासनाने ठरविलेल्या दरात CGHS नुसार केल्या जाणार आहे. जळगाव जिल्ह्यातील लाखो नागरिकांना या लॅबचा उपयोग होणार असल्याची माहिती माजी मंत्री आ.गिरीष महाजन यांनी दिली.
कोरोनाचा स्वॅब घेतला जाणार
कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून या लॅबमध्ये कोरोना संशयीत रुग्णांचे स्वॅब घेतले जाणार आहेत. सर्व स्वॅब पुणे येथील अत्याधुनिक प्रयोगशाळेत पाठविले जाणार असून लवकरात लवकर अहवाल दिला जाणार आहे. कोरोना स्वॅबसाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे.
वर्षभरापासून पाठपुरावा, १ जूनला लोकार्पण
जळगाव जिल्हावासियांसाठी साकारण्यात येत असलेल्या लॅबसाठी गेल्या १ वर्षापासून पाठपुरावा सुरू होता. बांधकामाची सर्व कामे जवळपास झाली असून अत्याधुनिक तपासणी मशीन दोन दिवसात उपलब्ध होऊन १ जून पासून लॅब जनतेसाठी कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती माजी मंत्री आ.गिरीष महाजन यांनी दिली आहे.
परिसरात मनपा करणार सुशोभिकरण
नानीबाई रुग्णालयाचा संपूर्ण कायापालट झाला असून जिल्हावासियांना अल्पदरात तपासण्या करून मिळणार आहे. तपासणीसाठी जिल्हाभरातील रुग्ण त्याठिकाणी येणार असल्याने रुग्णालयाच्या बाहेरील परिसरात स्वच्छता करून झाडे लावण्यात येतील तसेच विहीर बंद करून बोअरवेलद्वारे पाण्याची व्यवस्था करण्यात येईल. परिसरात नागरिकांना बसण्यासाठी पेव्हर ब्लॉक आणि बाक बसविण्यासाठी मनपा प्रशासनाकडून व्यवस्था करण्यात येईल अशी माहिती महापौर भारती सोनवणे व स्थायी समिती सभापती ऍड.शुचिता हाडा यांनी दिली आहे.