मुंबई वृत्तसंस्था । फडणवीस सरकारच्या काळातील महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे आदेश निघाल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपला टोला लगावलाय. या योजनेमुळे ‘शिवार’ खरंच जलयुक्त झाले की फक्त पाण्याऐवजी पैसेच मुरले?, हे आता स्पष्ट होईल, असे रोहित यांनी म्हटले.
ग्रामीण भागासाठी क्रांतिकारी योजना असल्याचा मागील भाजप सरकारने गाजावाजा केलेल्या जलयुक्त शिवार योजनेचा फुगा कॅगच्या अहवालाने फुटला. तब्बल ९६३३ कोटी खर्चूनही भूजलपातळीत वाढ झाली नसेल तर हे पैसे कुठं मुरले व कुणाची पातळी उंचावली याचा तपास होण्याची गरज रोहित पवार यांनी व्यक्त केली.
तसेच जलयुक्त शिवार योजनेची एसआयटी मार्फत चौकशी करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले. त्यामुळे ही खरंच जलयुक्त योजना होती की या योजनेत पाण्याऐवजी फक्त पैसेच मुरले हे स्पष्ट होईल, असे रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
रोहित पवार चर्चेत राहण्यासाठी भाजपच्या बड्या नेत्यांवर टीका करतात, असा आरोप नुकताच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला होता. यानंतर रोहित पवार यांनी भाजपला पुन्हा एकदा डिवचले आहे. त्यामुळे आता भाजप रोहित पवारांना काय प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.