जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । छत्रपती शिवाजी महाराज जलतरण तलावात सलमान शेख शकील बागवान (वय-२२, रा. बागवान मोहल्ला) या तरुणाचा बुडून मृत्यू झाला होता. याप्रकरणी अखेर गुरूवार २२ जून रोजी दुपारी ३ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात जलतरण व्यवस्थापकासह इतर 3 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील जोशी पेठेतील बागवान मोहल्ल्यातील सलमान शेख शकील बागवान हा तरुण त्याचे मित्र फैजल जावेद बागवान, अझर अकबर बागवान, शेख हुजेफा शेख आतिक, फरान शाहीद बागवान यांच्यासोबत रविवारी १८ रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास जिल्हा क्रिडा संकुलातील जलतरण तलावात पोहण्यासाठी गेले होते. याठिकाणी तलावात सुमारे ५५ ते ६० मुले पोहण्यासाठी उतलेली होती. यावेळी जनरल बॅच असल्याने याठिकाणी एकही कोच उपस्थित नव्हता. पोहून बाहेर आल्यानंतर पोहण्यासाठी पाण्यात उतरलेला सलमान शेख शकील बागवान हा बाहेर आला नसल्याने त्याच्या मित्रांना दिसले. त्याने याबाबतची माहिती काम करणार्या पंकजला नावाच्या व्यक्तीला दिली. परंतु त्याने प्रतिसाद न दिल्यामुळे सलमानच्या मित्रांनी ठेकेदार राहुल सुर्यवंशी याला सांगितले.
ठेकेदार राहुल सुर्यवंशी याने पाण्यात बांबू टाकून बघितला. यावेळी त्याला कडक भाग लागल्याने त्याने कर्मचार्यांना पाण्यात उतरण्यास सांगितले. त्यानुसार तेव्हा तेथील कर्मचारी पाण्यात उतरला असता, त्याने तळाशी असलेल्या सलमान शेख शकील बागवान याला पाण्यातून बाहेर काढले. त्याला लागलीच जिल्हा रुग्णालयात नेले, याठिकाणी वैद्यकीय अधिकार्यांनी तपासणी करीत त्याला मयत घोषीत केले होत. याप्रकरणी अखेर फैजल जावेद बागवान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून व्यावस्थापक राहूल विजय सुर्यवंशी, लाईफ गार्ड सुनिल चौधरी, यावद महाले आणि पंकज पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.