फैजपूर ता. यावल प्रतिनिधी । लोकसहभागातून बंधारा फैजपूर येथील वॉटर फिल्टर हाऊसच्या पाठीमागे रोझोदा मधला रस्ता या ठिकाणी तयार करण्यात आला असून या बंधाऱ्याची रेती, माती रातोरात वाळूमाफियांनी चोरी करून वाहून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
लोकसहभागातून करण्यात आलेल्या या कामाच्या बंधार्याची शेकडो ब्रास वाळू, माती रातोरात चार-पाच ट्रॅक्टरच्या सहाय्याने बिनबोभाट वाहून नेली जात आहे. गेल्या दोन-तीन दिवसापासून हा प्रकार सुरू असल्याने याची फैजपूर शहरात चर्चा सुरू आहे. प्रांताधिकारी, सर्कल व तलाठी यांनी या प्रकाराची चौकशी करून संबंधित ट्रॅक्टर मालक वाळू माफियांवर कडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
गेल्यावर्षी लोकसहभागातून स्व. हरिभाऊ जावळे व महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज यांच्या पुढाकाराने संत- महंत, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांच्या सहभागातून यावल व रावेर तालुक्यात ठीकठिकाणी जलक्रांती अभियानातून बंधारे बांधण्यात आले . लाखो लिटर पाणी अडविण्यात आले. नेहमीप्रमाणे राजकीय पाठबळ आणि गुंडागर्दीच्या जोरावर वाळू तस्कर अशा चोऱ्या करत असतिल आणि पोलीस व प्रशासन फक्त गम्मत पाहणार असेल तर यापुढे लोकसहभागातून अशी विधायक कामे पूर्ण करण्यातही कुणी पुढाकार घेणार नाही असा संताप शहरात व्यक्त होत आहे .