औरंगाबाद: वृत्तसंस्था । उत्तर महाराष्ट्रातील दिग्गज नेते एकनाथ खडसे यांच्यानंतर भाजपाला दुसरा धक्का बसला आहे आता . माजी केंद्रीय राज्यमंत्री जयसिंगराव गायकवाड यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
संघाच्या मुशीतून घडलेले जयसिंगराव गायकवाड हे जनसंघापासून भाजपमध्ये कार्यरत होते. गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत त्यांनी मराठवाड्यात पक्षाच्या विस्तारासाठी काम केले होते. बीड लोकसभा मतदारसंघातून ते तीन वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. मराठवाडा पदवीधर मतदारसंघातूनही त्यांनी दोनदा बाजी मारली होती. त्यांनी राज्य मंत्रिमंडळात सहकार राज्यमंत्रिपद भूषवले होते. केंद्रात शिक्षण व खाण राज्यमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडली होती. सध्या ते भाजपच्या प्रदेश कार्यसमितीचे सदस्य होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मात्र ते सक्रिय राजकारणातून बाजूला फेकले गेले होते.
यापूर्वीही त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. राष्ट्रवादीच्या तिकिटावर खासदार म्हणून ते निवडूनही आले होते. मात्र, त्यानंतर ते पुन्हा स्वगृही परतले होते. ‘पक्षात सन्मानाची वागणूक मिळत नाही. काम दिलं जात नाही,’ असा आरोप त्यांनी केला आहे. त्या नाराजीतूनच त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. आगामी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मराठवाडा विभागातून त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. आज दुपारी ते आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार आहेत.
एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकल्यानंतर भाजपचे अनेक नेते व पदाधिकारी बाहेर पडतील, असं बोललं जात होतं. जयसिंगराव गायकवाड यांच्या राजीनाम्याकडं त्याचाच एक भाग म्हणून पाहिलं जात आहे. गायकवाड हे पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार की इतर कुठल्या पक्षाची निवड करणार याबाबत आता उत्सुकता आहे.