औरंगाबाद (वृत्तसंस्था) आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भाषणादरम्यान, मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात घोषणाबाजी केल्यामुळे गोंधळ उडाला होता.
मराठा समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात तसेच चालू अर्थसंकल्पामध्ये मराठा समाजासाठी आवश्यक ती आर्थिक तरतूद करण्यात यावी. तसेच महाआघाडी सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले तर येणाऱ्या काळात राज्यभर तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल. तसेच गेल्या ४० दिवसांपासून आमचे काही बांधव आपला संसार, घरदार सोडून आझाद मैदानात उपोषणाला बसले आहेत. तरी सरकारमधील एकही मंत्री त्यांच्याकडे गेलेले नाहीत. त्यामुळे आता मराठा क्रांती ठोक मोर्चाने रोखठोक भूमिका घेतली आहे. यानंतर जो कुणी मंत्री, आमदार, खासदार आमच्या मतदारसंघात फिरणार त्याला आम्ही जाब विचारणार, असा इशाराही मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी दिला.