औरंगाबाद, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – औरंगाबाद शहरात जमावबंदी संदर्भात कोणतेही आदेश देण्यात आलेले नसल्याची माहिती पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांनी दिली आहे.
आगामी काळात सणवार तसेच विविध आंदोलनांच्या कारणावरून पोलिसांनी जमावबंदी लागू केल्याचे वृत्त होते. परंतु जमावबंदी लागू करण्यात आली असल्याची माहिती चुकीची असल्याचे औरंगाबाद पोलीस आयुक्त गुप्ता यांनी प्रसारमाध्यमाशी बोलतांना सांगितले.
कलम १४४ संदर्भात कोणतेही आदेश काढण्यात आलेले नाहीत. सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी, नागरिकांच्या हालचाली, काठ्या, शस्त्रे जवळ बाळगणे याबाबत पोलीस प्रशासन नेहमीच सतर्क असते, दैनंदिन घडामोडी जसे मोर्चा, धरणे, आंदोलने यासंदर्भात नियमितपणे १५ दिवसांनी आढावा घेतला जातो. कोणत्याही सभेमुळे किंवा विशिष्ट कारणामुळे हे आदेश काढले जात नाहीत. हा एक नियमित आदेश तसेच सामान्य प्रक्रिया असून वर्षभर असे अनेक आदेश दिले जात असतात. तसेच राज ठाकरेंच्या सभेबाबत अजून निर्णय झालेला नाही. परवानगी निर्णय झाल्यानंतर माहिती देण्यात येईल असेही पोलीस आयुक्त गुप्ता यांनी म्हटले आहे.