मुक्ताईनगर प्रतिनिधी । येथे आज माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या जीवनावर आधारीत जनसेवेचे मानबिंदू एकनाथराव खडसे या पुस्तकाचे प्रकाशन झाले. यात भाजपमधील मान्यवरांनी ऑनलाईन पध्दतीत पुस्तकाला शुभेच्छा देतांना नाथाभाऊंच्या योगदानाबद्दल कौतुकोदगार काढले.
भुसावळ येथील नगरसेवक डॉ. सुनील नेवे यांनी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या जीवनावर आधारित जनसेवेचे मानबिंदू एकनाथराव खडसे हे पुस्तक लिहले आहे. नाथाभाऊंच्या वाढदिवसाला अर्थात २ सप्टेंबर रोजी याचे प्रकाशन होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. तथापि, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या मृत्यूमुळे राष्ट्रीय शोक असल्याने हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता. आज खडसे फार्मवर हा कार्यक्रम झाला.
या कार्यक्रमाला महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज, खासदार रक्षाताई खडसे, माजी आमदार डॉ. गुरूमुख जगवाणी, जिल्हा बँकेच्या अध्यक्ष रोहिणीताई खडसे आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांसह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व रावसाहेब दानवे यांच्यासह माजी विधानसभाध्यक्ष हरीभाऊ बागडे व माजी मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी ऑनलाईनच्या माध्यमातून पुस्तकाचे प्रकाशन केले.