नवी दिल्ली : वृत्तसंस्था । हाथरस गुन्ह्याने अवघा देश ढवळून निघालाय. पीडितेच्या मृत्यूनंतर तिचा मृतदेह कुटुंबीयांशिवाय जाळल्यामुळे उत्तर प्रदेश प्रशासनाचा क्रूर चेहराच समोर आला. उलट मुलीवर बलात्कार झाल्याचं नसल्याचा दावा उत्तर प्रदेशचे अतिरिक्त पोलिस महासंचालकांनी केला. नंतर दिल्लीत पुन्हा जनता हाथरसच्या ‘निर्भया’ला न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरलेली दिसतेय.
भीम आर्मी पक्षाचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी इंडिया गेटवर प्रदर्शनासाठी जनतेला आवाहन केलं होतं. पोलिसांनी गुरुवारी गर्दीला प्रतिबंध करण्यासाठी निर्देश जारी केले होते. त्यानंतर चंद्रशेखर यांनी जंतर मंतरवर हे आंदोलन हलवलं. भीम आर्मीच्या शेकडो कार्यकर्त्यांसहीत दिल्लीची जनताही या आंदोलनात सहभागी झाली.
‘मी हाथरसला भेट देणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा देईपर्यंत आणि न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहील’ असं म्हणतानाच सर्वोच्च न्यायालयानं हस्तक्षेप करावा, अशी मागणी चंद्रशेखर आझाद यांनी केली. अगोदर हाथरस पीडित कुटुंबाला भेट देण्याच्या तयारीत असलेल्या चंद्रशेखर आझाद यांना त्यांच्याच घरात प्रशासनानं नजरकैद केलं
दिल्लीचं जंतर मंतर कोरोना काळातही गजबजलंय. शुक्रवारी शेकडो लोक या घटनेच्या निर्षधार्थ कोरोनाचा धोका पत्करून जमलेले दिसत आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हेदेखील उपस्थित राहणार असल्याचं सांगण्यात येतंय. मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर अरविंद केजरीवाल पहिल्यांदाच जनतेच्या आंदोलनात सहभागी होतील.
जंतर मंतरवर सुरू झालेल्या निदर्शनात इतर विरोधी पक्षाचे नेतेही सहभागी झाले आहेत. सीपीएम नेते सीताराम येचुरी आणि सीपीआय नेते डी राज हेदेखील जंतर मंतरवर उपस्थित झाले आहेत.
गुरुवारी हाथरस पीडित कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी निघालेल्या राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना रस्त्यातच रोखण्यात आल्यानंतर काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वाड्रा दिल्लीच्या वाल्मिकी मंदिरात पोहचल्या. शुक्रवारी मंदिर मार्ग स्थित वाल्मिकी मंदिरात दाखल होत प्रियांका गांधी हाथरसच्या निर्भयाच्या प्रार्थनासभेत सहभागी झाल्या.