पुणेः वृत्तसंस्था । ”छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा खरा इतिहास जनतेसमोर येण्याची आता खरी गरज आहे”, असं राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ म्हणाले
. आजपर्यंत नाटक, सिनेमांतून, पुस्तकातून पाहायला मिळणारा छत्रपती राजवटीच्या शौर्याचा खरा इतिहास आता जनतेसमोर येण्याची आवश्यकता आहे, त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे छगन भुजबळ म्हणालेत.
छत्रपती संभाजी महाराज यांचा आज ३४१ वा राज्यभिषेक सोहळा पुणे जिल्ह्यातील तुळापूर येथे संपन्न झाला, त्याला राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थिती दर्शवली. छगन भुजबळ छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीस्थळी भेट देत नतमस्तक झाले, यासह अनेक शंभू भक्त ही या वेळी नतमस्तक होण्यासाठी उपस्थित होते. त्यावेळी छगन भुजबळांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.
धनंजय मुंडे प्रकरणावर बोलत असताना तक्रारदार महिलेच्या विरोधात अनेक तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल आहेत. त्यामुळे जनतेने ठरवावे की धनंजय मुंडे प्रकरणात कसे पाहावे, असे म्हणत मुंडे प्रकरणावर बोलण्यास छगन भुजबळ यांनी टाळाटाळ केली.
छगन भुजबळ यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची पाठराखण केली होती. “धनंजय मुंडे यांच्यासंदर्भात आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते बोलले आहेत. फक्त कुणावर अन्याय होता काम नये. त्या महिलेविरुद्ध ४ ते ५ लोकांनी तक्रारी केल्या आहेत. यावरून जनतेने समजून घेतलं आहे,” असं अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलंय.