जळगाव, प्रतिनिधी | शहरातील गेंदालाल मिल परिसरातील रहिवासी शंकर निकम यांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात संशयास्पद मृत्यू झाला असून त्याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करत त्यांच्या पत्नी आणि आई यांनी उपोषण सुरु केले होते. या उपोषणाची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी समितीची स्थापना केल्याने उपोषण स्थगित करण्यात आले आहे.
गेंदालाल मिल येथील रहिवासी शंकर मधुकर निकम यांचा दि. ११ ऑगस्ट २०२१ रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात चुकीच्या उपचारांनी मृत्यू झाल्याचा आरोप करत या घटनेची सखोल चौकशी करून संबधित दोषी डॉक्टर व परिचारिका यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावा यामागणीसाठी त्यांची आई श्रीमती सुमनबाई निकम व पत्नी श्रीमती रेखा निकम यांनी बुधवार २० ऑक्टोबर पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु केले होते. या उपोषणावेळी त्यांच्यासोबत मयत शंकर निकम यांची ३ वर्षांची चिमुरडी मुलगी कनक देखील बसलेली होती. याची दखल घेत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी शंकर निकम यांच्या मृत्युची चौकशी करण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व काही खाजगी तज्ञ डॉक्टर्स यांची समिती गठीत केली आहे. ही समिती ८ दिवसात अहवाल सादर करणार असून या चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे आंदोलकांच्या वतीने भेटण्यास आलेल्या शिष्टमंडळास जिल्हाधिकारी यांनी सांगितले. आंदोलकांच्या वतीने छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे, मंगल भालेराव, श्रावण अहिरे, संजय निकम, भैय्या निकम, श्रावण सपकाळे यांनी जिल्हाधिकारी अभिजात राऊत यांच्याशी चर्चा केली. अमोल कोल्हे यांच्या हस्ते उपोषणकर्त्यांना सरबत देऊन उपोषण तूर्त स्थगित करण्यात आलेले आहे. निकम कुटुंबियांना न्याय न मिळाल्यास छावा मराठा युवा महासंघातर्फे न्यायालयात दाद मागणार येणार आहे.