ठाणे (वृत्तसंस्था) कल्याणच्या एपीएमसी मार्केटमध्ये मोबाईल चोरीच्या संशयावरून 2 तरुणांना विवस्त्र करुन बेदम मारहाण करत धिंड काढल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मनीष गोसावी आणि सिद्धूक गुजर अशी पीडित तरुणांची नावं आहेत.
कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात मागील काही काळापासून मोबाईल चोरीच्या घटना घडत होत्या. त्याच पार्श्वभूमीवर बाजार समितीच्या भाजीपाला विभागात दोन तरुण फिरताना दिसले असता एका व्यापाऱ्याने त्यांच्यावर मोबाईल चोरीचा संशय घेतला. व्यापाऱ्याने कुठल्याही प्रकारची शहानिशा न करता दोघांना विवस्त्र करून मारहाण केली. एवढेच नव्हे तर दोघांची धिंडही काढली. तेथे जमलेल्या जमावाने पीडित तरुणांना मारहाणही केली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तरुणांना मारहाण करणाऱ्या 5 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.