जळगाव प्रतिनिधी । जामनेर तालुक्यात दुचाकी चोरीच्या घटना वाढल्यामुळे एका अट्टल दुचाकीचोराट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका पंटरच्या माध्यमातून चोरीची दुचाकी खरेदी करण्याचा सापळा रचुन अटक केली. त्याच्याकडून चोरीच्या आठ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जमील अय्युब शेख (वय २४, रा. वाळुज एमआयडीसी, औरंगाबाद, मुळ रा. पिंपळगाव हरे, ता. पाचोरा) असे अटक केलेल्या दुचाकीचोराचे नाव आहे. जामनेर तालुक्यात दुचाकीचोरीच्या घटना वाढल्या आहेत. त्या अनुशंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी कर्मचाऱ्यांना सुचना केल्या होत्या. दरम्यान, या परिसरात जमील नावाचा तरुण दुचाकी चोरुननंतर औरंगाबाद जिल्ह्यात विक्री करीत असल्याची गुप्त माहिती कर्मचारी विजय शामराव पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक सुधाकर लहारे, दादाभाऊ पाटील, विजय पाटील, नंदलाल पाटील, भगवान पाटील, सचिन महाजन व इशान तडवी यांचे पथक तयार करण्यात आले. या पथकाने एका पंटरच्या माध्यमातून चोरीची दुचाकी खरेदी करण्याचा सापळा रचला. त्यानंतर जमील शेख याने दुचाकी देण्याचे मान्य केले. हा सर्व व्यवहार औरंगाबाद शहरात होणार असल्याने पथक तेथे रवाना झाले. जमील याने चोरीची दुचाकी पंटरकडे देताच पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीच्या आठ दुचाकी पथकाने हस्तगत केल्या आहेत.