जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील गणपती नगरात बंद घर फोडून सोन्याचे दागिने व रोकड लांबविणाऱ्या दोन आरोपींना रामानंदनगर पोलीसांनी अटक केली होती. दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली होती. त्यांच्याकडून सोने खरेदी करणारा संशयित निरज सुरेशचंद्र छाजेड यालादेखील पोलीसांनी अटक केली आहे. रामानंदनगर पेालीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, शहरातील गणपती नगरात राहणारे विशाल जैन यांचे बंद घर फोडून सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकुण ३ लाख ५८ हजारांचा मुद्देमाल लांबविल्याची घटना १२ जून रोजी उघडकीला आली होती. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील संशयित आरोपींच्या शोधासाठी पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांनी पथकाच्या सुचना दिल्या होत्या. पथकाने तपासाची चक्रे फिरवत रामानंद नगर पोलीसांनी संशयित आरोपी राकेश गोकुळ राठोड आणि उमेश गोकुळ राठोड या दोघांना अटक केली होती. त्यांनी गणपती नगरात बंद घर फोडून सोन्याचे दागिने आणि रोकड लांबविल्याची कबुली दिली होती. दोघांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी जळगावातील निर्मल सराफ दुकानात सोने विक्री केल्याचे सांगितले. त्यानुसार पोलीसांनी निरज सुरेशचंद्र छाजेड याला रविवारी २ जुलै रोजी दुपारी २ वाजता अटक केली आहे. याबाबत रामांनद नगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख , पोउनि प्रदीप बोरूडे, पोहेकॉ संजय सपकाळे, सुशिल चौधरी, पो.ना. रेवानंद साळुंखे, रविंद्र चौधरी, राजेश चव्हाण, विजय खैरे, अतुल चौधरी, उमेश पवार, अनिल सोननी, दिपक वंजारी यांनी केली.