चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून दोन लाखांचा ऐवज केला लंपास

जळगाव, प्रतिनिधी । सहकुटुंब नातेवाईकांकडे लग्नासाठी गेल्याने बंद घरात चोरट्यांनी घरफोडी करीत १ लाख ९३ हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना आज सकाळच्या सुमारास उघडकीस आल्याने सहकुटुंब लग्नासाठी जाणे चांगलेच महागात पडले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील ईच्छादेवी चौकाजवळी फुकटपुर्‍यातील फरजाना बी आसीफ खान या आपल्या कुटुंबियांसोबत वास्तव्यास आहेत. त्यांच्या पतीची मालवाहू गाडी असून त्यांचा मुलगा घरातच किरणा दुकान चालवून कुटुंबाला हातभार लावतो. फरजाना बी यांच्या नातेवाईकांकडे आज लग्न असल्याने ते शनिवारी रात्री सहकुटुंब पाचोरा येथे लग्नासाठी गेले होते. गावाला जातांना त्यांनी शेजारच्यांना घराकडे लक्ष ठेवा म्हणून सांगितले होते. रविवारी सकाळी आठ वाजताच शेजारी राहणार्‍या सलमान नावाच्या तरुणाने फोन करुन दुकान व घराचे कुलुप तुटल्याची माहिती दिली. त्यामुळे आसीफ खान यांनी तातडीने घर गाठले असता दोन्ही कुलुप तोडलेले होते तर कपाटही तुटलेले होते. तसेच कपाटात ठेवलेले सोने, चांदिच्या दागिन्यांसह पैसेही चोरट्यांनी लांबविले होते.
चोरीस गेलेला मुद्देमाल
चोरट्यांनी ४० हजार रुपये किंमतीचे कानातील रिंग, १५ हजारांची सोन्याची पोत, ९ हजारांची सोन्याची अंगठी, ३६ हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र, १ हजार ५०० रुपयांची लहानमुलाची अंगठी, ३ हजारांचे बाळाचे दागिने, १२ हजारांचे पायातील फुलतोडे, ३०० रुपयांची चांदीची चैन, ४ हजार ५०० रुपयांचे हातातील कडे व ७२ हजार रुपये रोख असा एकूण १ लाख ९३ हजारांचा मुद्देमाल चोरट्यांने लंपास केला. चोरी केल्यानंतर चोरट्यांनी किरणा दुकानातील सामानाची नासधूस केली होती.
दाटिवाटीच्या परिसरात चोरट्याने फोडले घर
फुकटपूरा हा परिसरत अत्यंत दाटीवाटीचा परिसर असून याठिकाणी दिवसरात्र वर्दळ सुरु असते. एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती कळविली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. याप्रकरणी फरजाना बी आसीफ खान यांच्या तक्रारीवरुन एमआयडीसी पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content