चोपडा प्रतिनिधी । रोटरी क्लब ऑफ चोपडा आणि पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यामानाने तालुक्यातील शिक्षकांसाठी सात दिवसीय डिजिटल स्किल फॉर स्मार्ट टिचींग प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांचे यशस्विरित्या समारोप करण्यात आला.
टीच या प्रोग्रॅममधील पहिला स्तंभ टी- टीचर्स सपोर्ट (शिक्षकांना सहाय्य) याअंतर्गत शिक्षकांसाठी मोफत डिजिटल कौशल्ये प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. ७ दिवस चालणाऱ्या या उपक्रमात १५ आयटी स्किल्सची सीरिज शिक्षकांच्या व्हॉटसअप ग्रुपमध्ये पाठविण्यात आली. दररोज तीन आयटी कौशल्ये व्हिडीओ आणि त्यावरील प्रश्न या whatsapp ग्रुपमध्ये पाठविली जात होती. पुढील दिवशी त्या प्रश्नांची उत्तरे देणारा व्हिडिओ, नवीन कौशल्याचा व्हिडिओ आणि त्यावरील प्रश्न ह्या स्वरुपात ही सीरिज पुढे सुरु होती. रोटरी क्लब ऑफ चोपडा मार्फत शिक्षकांना हे व्हिडिओ रोजच्या रोज पाठविले जात होते . सहावा दिवस सरावासाठी होता. सातव्या दिवशी ऑनलाईन टेस्ट घेतली गेली व टेस्ट सबमिट केलेल्या शिक्षकांना लगेच सहभागाचे ई-प्रमाणपत्र ईमेलद्वारे देण्यात आले.
सदर उपक्रम ३ ऑगस्ट ते ९ ऑगस्ट २०२० दरम्यान आयोजित करण्यात आला. त्यात शिक्षकांचे व्हाट्सएपचे ३ ग्रुप तयार करण्यात आले होते, शिक्षकांना दररोज ३ व्हिडिओ पाठविले जात, शिक्षक आपल्या वेळेनुसार व्हिडिओचा अभ्यास करत व व्हिडिओवर आधारित प्रश्न सोडवित.सदर प्रशिक्षण कार्यक्रम सर्वांसाठी खुला व मोफत होता.
चोपडा पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी डॉ भावना भोसले यांनी झूम मिटिंगद्वारे सर्व सहभागी शिक्षकांना मार्गदर्शन केले. लॉकडाउनच्या काळात शाळा बंद पण शिक्षण सुरू या संकल्पनेतुन डिजिटल स्किल फॉर स्मार्ट टीचिंग हा प्रशिक्षण कार्यक्रम रोटरी क्लब ऑफ चोपडा या शाखेचा शैक्षणिक व सामाजिक बांधीलकी जोपासनारा उत्तम दर्जाचा कार्यक्रम म्हणता येईल तसेच लॉकडाउनच्या काळात शिक्षकांना नवीन शैक्षणिक स्किल शिकण्याची मोठी संधी उपलब्ध झाल्यामुळे शिक्षकांना प्रत्यक्ष वर्गात अध्यापन करतांना तसेच ऑनलाइन अभ्यास घेताना सदर स्किलचा निश्चितच फायदा होईल, असे उपक्रम व प्रशिक्षण रोटरीने नेहमी आयोजित करावेत अशी शिक्षक वर्गातुन मागणी होत आहे. प्रोजेक्ट यशस्वीतेसाठी रोटरी क्लब चोपडाचे अध्यक्ष नितीन अहिरराव, सचिव रुपेश पाटील, गटशिक्षणाधिकारी डॉ. भावना भोसले तसेच प्रोजेक्ट चेअरमन पंकज बोरोले , विलास पी.पाटील व सर्व रोटरी क्लब ऑफ चोपडा सदस्यांनी परिश्रम घेतले.