चोपडा, प्रतिनिधी | येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयात राज्यशास्त्र विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२५ जानेवारी रोजी ‘राष्ट्रीय मतदार दिवस’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी होते तर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते नरेंद्र सोनवणे (केंद्र प्रमुख,पं.स.चोपडा) तसेच उपप्राचार्य एन.एस.कोल्हे, उपप्राचार्य डॉ.के.एन.सोनवणे, डी.पी.सपकाळे (रा.से.यो.कार्यक्रम अधिकारी) आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यशास्त्र विभागप्रमुख डी.डी.कर्दपवार यांनी केले तर डॉ.आर.आर.पाटील यांनी प्रमुख वक्ते यांचा परिचय करून दिला. यावेळी उपस्थित प्राध्यापक बंधू-भगिनी व विद्यार्थ्यांनी ‘राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त’ सामूहिक शपथ घेतली. या सामूहिक शपथेचे वाचन बी.बी.पवार यांनी केले.
यावेळी नरेंद्र सोनवणे मार्गदर्शन करतांना म्हणाले की, ‘भारतीय संविधानाने सर्व भारतीयांना आपले मुलभूत अधिकारांसोबतच काही कर्तव्येही दिली आहेत. त्यातील सर्वात महत्वाचे कर्तव्य म्हणजे मतदानाचा अधिकार बजावणे हा आहे. परंतू भारतात आजही मतदानाची टक्केवारी खूप कमी आहे. कारण नागरिक मतदानाचे कर्तव्य जबाबदारीने बजावतांना दिसत नाहीत. मतदानाविषयी जागृती निर्माण करणे प्रत्येकाची जबाबदारी आहे. निकोप लोकशाहीसाठी मतदानाची टक्केवारी वाढणे आवश्यक आहे.’
याप्रसंगी उपप्राचार्य एन.एस.कोल्हे यांनी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सर्वांनी मतदान करावे असे आवाहन केले. तर प्राचार्य डॉ.डी.ए. सूर्यवंशी यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून सांगितले की, विद्यार्थ्यांनी स्वतः मतदान कार्यात सहभाग घेऊन आपल्या परिवारात व समाजात मतदान जागृतीसाठी प्रयत्न करायला हवेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्ही.बी.पाटील यांनी केले तर उपस्थितांचे आभार डी.पी.सपकाळे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ए.बी.सूर्यवंशी, व्ही.पी.हौसे, एम.एल.भुसारे, डी.एस.पाटील, संदीप बी.पाटील, पी.एल.पाटील, सौ.एस.बी.पाटील, ए.बी.साळुंखे यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमाप्रसंगी बहुसंख्य विद्यार्थी व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.